डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील उल्हास खाडी किनारी जेट्टी भागात (गणेश विसर्जन घाट) मातीचे भराव टाकून मागील पाच दिवसांपासून खाडी किनारा बुजविण्याचे काम भूमाफियांनी सुरू केले आहे. खारफुटीचे घनदाट जंगल असलेला भाग मातीचे भराव टाकून बुजविण्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी छायाचित्रकार तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
मागील पाच दिवसांपासून डम्परने माती आणून भरती, ओहोटीची सीमा रेषा असलेल्या खाडी किनारी भागात माती टाकली जात आहे. हे मातीचे भराव कोणाच्या निदर्शनास येऊ नयेत म्हणून मातीचे ढीग पोकलेन, जेसीबीच्या साहाय्याने सपाट केले जात आहेत. डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा, मोठागाव, गरीबाचापाडा, गणेशनगर, कुंभारखाण पाडा, कोपर हा एकमेव हरितपट्टा शिल्लक आहे. शहरातील हरितपट्टे विकसित करा, असे आवाहन नुकतेच आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे. कुंभारखाणपाडा, देवीचापाडा हरितपट्ट्यात अधिक प्रमाणात बेकायदा चाळी, इमारतींची बांधकामे सुरू आहेत.
या बांधकामांचा प्रश्न कायम असताना देवीचापाडा येथे खाडी किनारी जेट्टीच्या भागात भूमाफियांनी मातीचे भराव टाकून खाडी किनारा बुजविण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सव काळात देवीचापाडा खाडी किनारच्या जेट्टी भागातील खारफुटीची जुनाट झाडे माफियांनी तोडून टाकली होती. खारफुटीचे जंगल नष्ट केले होते. या भागात दरवर्षी पर्यावरण प्रेमी नागरिक खारफुटीची लागवड करतात. त्यांचे संगोपन करतात. ही झाडे नष्ट करण्याचे काम भूमाफियांनी सुरू केले आहे. मातीचा भराव टाकणाऱ्या भूमाफियांना विरोध केला तर त्यांच्याकडून आक्रमक कृती होण्याची भीती असल्याने कुणीही नागरिक, पर्यावरणप्रेमी या विषयावर उघडपणे तक्रार करण्यास किंवा बोलण्यास तयार नाही.
हेही वाचा : ठाणे शहराचे तापमान चाळीशी पार
खाडी किनारा महाराष्ट्र सागरी किनारा नियमन, महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अखत्यारित येतो. या दोन्ही विभागांचे या महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष आहे. अधिक माहितीसाठी कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख, डोंबिवली विभागाचे मंडल अधिकारी दीपक गायकवाड यांना संपर्क केला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. “देवीचापाडा खाडी किनारी मातीचे भराव टाकून खाडी किनारा, खारफुटी नष्ट करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर प्रत्यक्ष पाहणी करून याविषयी महसूल विभागाला कळविले जाईल. पालिकेतर्फे संबंधितांवर कारवाई केली जाईल.” – राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.