डोंबिवली – परीक्षांचा हंगाम संपला आहे. मुले घर परिसरातील झाडे, मोकळ्या मैदानांमध्ये चेंडू, फळी आणि इतर खेळ खेळताना दिसत आहेत. डोंंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रस्त्यावरील जयहिंद काॅलनी भागात मुलांचा एक गट आपल्या सोसायटी परिसरात चेंडू फळी खेळत होता. खेळता खेळता चेंडू एका झाडाच्या दिशेने गेला. एक मुलगा तो चेंडू आणण्यासाठी गेला असता, त्याला झाडाखाली एक लाख रूपये किमतीचा आय फोन सापडला.
सोहम नरेश परदेशी (१२) असे आयफोन सापडलेल्या बालकाचे नाव आहे. सुरुवातीला सोहमला हा तुटलेला किंवा फेकून दिलेला फुटका मोबाईल असल्याचे जाणवले. त्याने मोबाईल उचलताच तो नवीन आयफोन असल्याचे दिसले. क्रिकेट सोडून सर्व मुले उत्सुकतेने झाडाखाली सोहमजवळ पोहचली. तो नवाकोरा आयफोन १३ असल्याचे स्पष्ट झाले. महागडा फोन झाडाखाली कोणी फेकून दिला असेल किंवा कोणाचा तरी मोबाईल याठिकाणी पडला असावा असा विचार करून सोहम याने आपल्या वडिलांना ही माहिती दिली.
अलीकडे मोबाईलचा वापर चांगल्या कामांबरोबर काही गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी वापरला जातो. असे कृत्य करून अनेक वेळा मोबाईल गटारात, पाण्यात किंवा निर्जनस्थळी फेकला जातो. अलीकडे मोबाईलच्या माध्यमातून चोर आणि चोरी करणारा पोलीस तांत्रिक कौशल्याच्या आधारे तात्काळ पकडतात.
सोहमच्या वडिलांनी मुलाकडून मोबाईल फोन ताब्यात घेतला. ज्याचा कोणाचा असेल तर त्याला तो मिळावा असा विचार करून आपल्या मुलाला सोबत घेऊन नरेश परदेशी यांनी विष्णुनगर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी जयहिंद काॅलनीत मुले क्रिकेट खेळत असताना त्यांना तेथे कशा पध्दतीने मोबाईल सापडला याची माहिती दिली. पोलिसांनी ही माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांना दिली.
पोलीस निरीक्षक गमे यांनी सोहम परदेशीला क्रिकेट खेळताना मोबाईल कसा सापडला याची माहिती घेतली. हा फोन ज्याचा कोणाचा असेल त्याला तो मिळावा म्हणून सोहम परदेशी याच्या हस्ते पोलीस निरीक्षक गमे यांनी सापडलेला आयफोन स्वीकारला. सोहमच्या प्रामाणिकपणाचे पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले. या मोबाईल प्रकरणाची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अनेक वेळा गु्न्हेगार पोलिसांना चकवा देण्यासाठी, आपला माग लपविण्यासाठी जवळील मोबाईल निर्जन ठिकाणी, पाण्यात किंवा तोडमोड करून फेकून देतात. पण, जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस अचूक असे मोबाईल किंवा मोबाईल वापरकर्त्याचा शोध घेतात. निर्जन ठिकाणी, कोणी फेकून दिलेले मोबाईल शक्यतो वापरू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.