डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात सर्वाधिक बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बेकायदा बांधकामांच्या वारंवार तक्रारी करूनही ह प्रभागाच्या तोडकाम पथकांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने तक्रारदार आणि परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता कोपरमधील चरू बामा शाळेच्या मागील भागात कॅप्टन तुकाराम हश्या म्हात्रे रस्त्यावर कृष्णा टाॅवरजवळ जुनाट आंबे आणि वनराई तोडून त्या जागेवर भूमाफियांनी सात माळ्याच्या बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेच्या उद्यान विभागाच्या परवानग्या न घेता या बेकायदा इमारतीसाठी भूमाफियांनी जुनाट झाडे पालिकेच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन तोडून टाकली आहेत. या इमारतीच्या पायाभरणीचे काम रात्रंदिवसात पूर्ण करून पाऊस सुरू होण्यापूर्वी या इमारतीच्या उभारणीचे काम भूमाफियांनी सुरू केले आहे. पालिकेच्या नगररचना विभागाच्या बांधकाम परवानग्या न घेता स्थानिक भूमाफियांनी या बेकायदा बांधकामाची उभारणी सुरू केली आहे, अशी तक्रार माहिती कार्यकर्ते विनोद गंगाराम जोशी यांनी पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे, ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्याकडे केली आहे. उपायुक्त तावडे यांची तक्रारदार जोशी यांंनी प्रत्यक्ष भेट घेतली आहे.

हेही वाचा : डम्पर अपघातामुळे डोंबिवलीतील कुटुंबीयांचे दुबईला जाण्याचे स्वप्न भंगले

ह प्रभागाचे राजेश सावंत यांंनी आपण निवडणूक कामात खूप व्यस्त आहोत. आता एका बैठकीत आहोत, असे सांगून म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला, असे तक्रारदार विनोद जोशी यांंनी सांंगितले. सर्व प्रभागांमध्ये बेकायदा बांधकामांवर जोरदार कारवाई सुरू असताना मागील दोन महिन्यात ह प्रभागात एकाही बेकायदा बांधकामांवर कारवाई न झाल्याने या प्रभागाचे साहाय्यक आयुक्त बेकायदा बांधकामांवर कारवाई का करत नाहीत, अशा तक्रारदारांच्या तक्रारी आहेत. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन ह प्रभागात बेकायदा बांधकामांवर का कारवाई केली जात नाही, याचा आढावा घेण्याची मागणी तक्रारदारांकडून केली जात आहे.

कोपर येथे चरू बामा शाळेच्या मागे सुरू असलेले बेकायदा बांधकामा पायभारणी स्तरावर असताना तोडून टाकण्याची मागणी तक्रारदार जोशी यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. कोपरमध्ये चरू बामा शाळा परिसरात अलीकडे एकही नवीन इमारत बांधकामाला परवानगी दिलेली नाही, असे नगररचना अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : मेगा ब्लॉक संपल्यानंतरही प्रवाशांचे हाल कायम, रेल्वे गाड्यांची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने

ह प्रभागातील बेकायदा बांधकामे

कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील शैलेश पाटील यांचा कोंबड्यांचा खुराडा, जुनी डोंंबिवलीतील प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांच्या फशी हाईट्स व गटारावर बांधलेली बेकायदा इमारत, ठाकुरवाडीत शाळेच्या आरक्षणावरील शिवलिला इमारत, राहुलनगरमधील रमाकांत आर्केड, सुदाम रेसिडेन्सी बेकायदा इमारती, कुंभारखाणपाडा खंडोबा मंदिरा समोरील बेकायदा इमारत. गणेशनगरमध्ये रेल्वे मैदानाच्या बाजुला सुरू असलेली बेकायदा इमारत.

मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ह प्रभाग हद्दीतील बेकायदा बांधकामांच्या जेवढ्या तक्रारी आहेत. त्या सर्व बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याची मोहीम हाती घेतली जाईल.

राजेश सावंत (साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग. डोंबिवली)
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli at kopar illegal construction work by destroying forest css
Show comments