डोंबिवली: डोंंबिवली पश्चिमेतील कोपर गाव येथील शंकर मंदिर रस्त्यावर बीएमपी गृहसंकुलाजवळ भूमाफियांनी या भागातील रस्ता बंंद करून एका सात माळ्याच्या बेकायदा इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. सामासिक अंंतर न ठेवता या भागातील गटार, मलनिस्सारण वाहिन्या तोडून या बेकायदा इमारतीची उभारणी करण्यात आल्याने या इमारतीच्या परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या बेकायदा इमारतीची कल्याण डोंबिवली पालिकेत तक्रार केली तर भूमाफियांंकडून त्रास होईल या भीतीने स्थानिक रहिवासी तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. या बेकायदा इमारतीमुळे आजुबाजुच्या इमारतींंमधील घरांमध्ये अंधार पसरला आहे. पावसाळ्यात या इमारतीच्या गच्चीवरील पाणी लगतच्या इमारतींवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उष्माघाताचे सर्वाधिक प्रमाण, बांधकामांवरील मजूर, कष्टकऱ्यांनाही फटका

या बेकायदा इमारतीला पालिकेककडून चोरीची नळजोडणी आणि महावितरणकडून वीज पुरवठा घेण्याच्या हालचाली भूमाफियांंनी सुरू केल्या आहेत. या बेकायदा इमारती मधील सदनिका माफियांनी घर खरेदीदारांना ही इमारत अधिकृत आहे असे सांगून बनावट कागदपत्रांच्या आधारे विकण्याच्याही हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती तक्रारदारांनी दिली. पालिकेच्या ह प्रभागाच्या हद्दीत हा भाग येतो. कोपर हद्दीत सर्वाधिक बेकायदा बांधकामे गेल्या पाच ते सहा वर्षाच्या कालावधीत उभी राहिली आहेत. या बेकायदा बांधकामांसाठी पालिकेची उद्याने, शाळा इतर सुविधांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांचा बेकायदा वापर करण्यात आला आहे, असे तक्रारदारांनी सांंगितले. कोपर मधील सखाराम नगर गृहसंकुलाच्या बाजुला अशाप्रकारच्या बेकायदा इमारती उभारण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले.

पालिकेचे भूखंड हडप करून, रस्ते बंद करून बेकायदा बांधकामे उभी राहिली जात असताना प्रशासनाकडून याविषयी आक्रमक भूमिका घेतली जात नसल्याने तक्रारदार, नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. कोपर रेल्वे स्थानकाजवळील कोंंबड्यांचा खुराडा आता आठ दिवस उलटले तरी ह प्रभाग अधिकारी, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त यांच्याकडून पाडला जात नसल्याने नागरिक, रेल्वे प्रवासी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

हेही वाचा : ठाण्याची जागा शिवसेनेकडे, मिरा भाईंदर भाजपात नाराजी

कोपर भागात बेकायदा इमारत उभारली की स्थानिकांच्या दबावामुळे कारवाई होत नाही या विचाराने भूमाफियांनी कोपर गाव हद्दीत आता बेकायदा चाळी, इमारती उभारणीसाठी आपला मोर्चा वळविला आहे. याप्रकरणी माहिती कार्यकर्ते विनोद जोशी यांनी पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अतिक्रमण आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे कोपर मधील शंकर मंंदिर रस्त्यावरील बेकायदा इमारतीची तक्रार केली आहे.

पालिका हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकामे उभे राहणार नाही असे हमीपत्र आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी मुंंबई उच्च न्यायालयाला देऊनही भूमाफिया बेकायदा बांधकामे उभारणे थांबवत नसल्याने पालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यामुळे न्यायालयात प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता कायदे तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

हेही वाचा : डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाण पूल कोंडीच्या विळख्यात, दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत पुलावर वाहनांचा रांगा

कोपरमधील बेकायदा बांधकामाची तक्रार प्राप्त झाली नाही. परंंतु, तेथे इमारतीचे बेकायदा बांधकाम झाले असेल तर त्याची सत्यता पडताळून ते बांधकाम तोडून टाकण्यात येईल.

राजेश सावंत (साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली)
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli at kopar road closed for construction of illegal building css