डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील नांदिवली पंचानंद येथील मुख्य वर्दळीच्या सर्वोदय रस्त्यावर एका बांधकाम व्यावसायिकाने रस्त्याचा अर्धा भाग अडवून बेकायदा गाळ्याची उभारणी सुरू केली आहे. चार ते पाच हजार नागरिक, विद्यार्थी, व्यापारी संकुलांमधील ग्राहक या रस्त्यावरून येजा करतात. मुख्य वर्दळीच्या रस्त्यात बांधकाम व्यावसायिकाकडून गाळ्याचे बांधकाम करण्यात येत असल्याने परिसरातील रहिवासी, शाळा चालक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
पालिका अधिकारी निवडणूक कामात व्यस्त आहेत, त्याचा गैरफायदा घेत हे बेकायदा बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या. ई प्रभागाच्या अखत्यारित नांदिवली पंचानंंद भाग येतो. नांदिवली पंचानंद भागात मागील आठ ते दहा वर्षात सर्वाधिक बेकायदा इमारती उभारणाऱ्या् मधुकर म्हात्रे या भूमाफियाने हे बेकायदा गाळ्यांचे बांधकाम सुरू केले असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले.
हेही वाचा : कोपर रेल्वे स्थानकाजवळ पोलिसाचा लोकलमधून पडून मृत्यू
नऊ मीटर रूंदीच्या सर्वोदय रस्त्याचा अर्धा भाग या गाळ्याने व्यापला आहे. या गाळ्याच्या बांधकामामुळे या भागातून वाहने नेता अडथळे येणार आहेत. या रस्त्यावरून सर्वोदय पार्क, सन फ्लाॅवर्स सोसायटी, अविघ्न सोसायटी, अनेक व्यापारी संकुले, शाळा, व्यायामशाळा या भागात आहेत. विद्यार्थी, पालकांची या रस्त्यावरून येजा असते. शाळेच्या बस, खासगी वाहने या रस्यावरून धावतात. गाळ्याचे बांधकाम सर्वोदय पार्कसमोरील पदपथाच्या जागेत करण्यात आले आहे. या एका बेकायदा गाळ्यामुळे या भागातील रस्त्यावर येत्या काही दिवसात इतर बेकायदा गाळे उभे राहण्याची भीती या भागातील रहिवाशांनी व्यक्त केली.
हेही वाचा : “…तर सामूहिक राजीनामे देणार”, काँग्रेसचा इशारा; उमेदवार निश्चितीपूर्वीच महाविकास आघाडीत दुही
नांदिवलीतील सर्वोदय रस्त्यावरील वळण मार्गावर हा गाळा बांधण्यात आल्याने वाहनांना वळण घेताना या गाळ्याचा त्रास होऊन या भागात नियमित वाहतूक कोंडी होणार आहे, अशा तक्रारी या भागातील रहिवाशांनी केल्या. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत एकही नवीन बेकायदा बांधकाम होणार नाही असे मुंबई उच्च न्यायालयातील एका दाव्यात न्यायालयाला हमीपत्रावर लिहून दिले आहे. तरीही आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता भर रस्त्यात नांदिवलीत बेकायदा बांधकाम सुूरू आहे. आयुक्तांनी या बेकायदा बांधकामाची गंभीर दखल घेऊन ते तातडीने भुईसपाट करण्याचे आदेश देण्याची मागणी नांदिवली पंचानंद भागातील नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
नांदिवली पंचानंद येथे मुख्य वर्दळीच्या रस्त्यात बेकायदा बांधकाम सुरू असेल तर त्याची तातडीने पाहणी करून वरिष्ठांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
भारत पवार, साहाय्यक आयुक्त, ई प्रभाग, डोंबिवली.