डोंबिवली : कल्याण शिळफाटा छेद रस्त्यावरील काटई ते बदलापूर-कर्जत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पाऊस थांबून महिना झाला तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्यावरील खड्डे भरणी, रस्ते सुस्थितीत करण्याची हाती घेतली जात नसल्याने प्रवासी हैराण आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन वर्षांपुर्वी काँक्रीटीकरण केलेल्या या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या कामाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. काटई ते बदलापूर-कर्जत रस्त्यावरून ठाणे, मुंबईकडून येणारी वाहने काटई येथे वळण घेऊन इच्छित स्थळी जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ, बदलापूर भागात औद्योगिक क्षेत्र असल्याने मालवाहू वाहने या रस्त्यावरून सर्वाधिक धावतात. या रस्त्याची काटई, खोणी, नेवाळी नाका भागात रस्त्याची चाळण झाली आहे. दोन वर्षापूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काँक्रीटीकरणातून बांधला आहे. परंतु या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पाऊस सुरू झाल्यापासून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. या रस्त्यावरील खड्डे मोठ्या आकाराचे झाले आहेत. रस्त्याच्या खालच्या भागातील खडी सततच्या वाहन वर्दळीमुळे रस्त्यावर पसरली आहे. या खडीवर दुचाकी घसरून अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळेत अनेक अपघात या रस्त्यावर होतात, अशा तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या.

हेही वाचा : ठाण्यातील १९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार; महापालिका आणि खासगी शाळांमधील शिक्षकांचा गौरव

कर्जतपासूनचा नवी मुंबई, ठाणे भागात नोकरी, व्यवसाय करत असलेल्या बहुतांशी नागरिक खासगी वाहनाने कर्जत-बदलापूर, काटई रस्त्याने प्रवास करतो. कर्जत, मुरबाड भागात जाण्यासाठी हा मधला मार्ग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मुंबई परिसरातील अनेक प्रवासी या रस्त्याला सर्वाधिक प्राधान्य देतात. यापूर्वी हा रस्ता एमआयडीसीच्या अखत्यारित होता. त्यावेळी या रस्त्याच्या देखभालीची कामे नियमित केली जात होती. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित गेल्यापासून या रस्त्यावरील कामे मार्गी लागत नाहीत, अशा तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी केल्या.

हेही वाचा : माजिवडा-कापूरबावडी चौकात कोंडी वाढण्याची शक्यता; येत्या दोन दिवसांत माजिवडा परिसरात मेट्रोच्या महत्त्वाच्या कामांना सुरूवात

या रस्त्याच्या खोणी गाव भागात अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला गटार करण्याचे काम सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू आहे. या गटारासाठी खोदलेली माती रस्त्यावर पसरत आहे. या रस्त्याकडे कोणाचे लक्ष नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. या रस्ते कामाच्या तक्रारी कुठे करायच्या असा प्रश्न स्थानिक नागरिकांसमोर आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी या रस्त्याकडे फिरकत नाहीत, अशा तक्रारी आहेत. कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील, कल्याण लोकसभेचे खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात हा रस्ता येतो. या दोन्ही नेत्यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून या रस्त्याची कामे हाती घेण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli bad condition of katai badlapur road people suffering due to potholes and dust css
Show comments