डोंबिवली : येथील पश्चिमेतील गरीबाचापाडा प्रभागाचे भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांच्या माजी नगरसेविका पत्नी कविता म्हात्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजप सदस्यत्व पदाचा राजीनामा मंगळवारी डोंबिवली पश्चिम भाजप अध्यक्ष समीर चिटणीस यांच्याकडे दिला. म्हात्रे यांच्या राजीनामा नाट्याने डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून विकास म्हात्रे प्रभागात कामे होत नाहीत म्हणून नाराज होते. या नाराजीवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या प्रभागात सर्वाधिक निधी यापूर्वी उपलब्ध करून दिला. त्यांच्या प्रभागातील रस्ते काँक्रीटचे करून दिले. भाजपमध्ये विकास कामांचा सर्वाधिक निधी विकास म्हात्रे यांनाच दिला जात होता, असे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकास म्हात्रे भाजपकडून स्थायी समितीत सभापती होते. शिवसेना शिंदे गटातील नेते विकास म्हात्रे यांच्या मागील वर्षापासून संपर्कात आहेत. त्याला म्हात्रे दाम्पत्याने दाद दिली नाही. निवडणुका तोंडावर आल्या आहेत. प्रभागात विकास कामे करण्यासाठी निधी नाही. निधी नसल्याने रस्ते, गटारे इतर कामे होत नसल्याने प्रभागातील नागरिक, कार्यकर्ते तीव्र नाराज आहेत. केंद्र, राज्यात भाजपची सत्ता असताना आपणास निधी का मिळत नाही, असे प्रश्न कार्यकर्ते करत असल्याने विकास म्हात्रे हा विषय वरिष्ठांकडे मांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता.

हेही वाचा : ठाकरे गटात पुन्हा मोठी फुट पडणार? शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या दाव्यामुळे चर्चेला सुरूवात

पत्नी कविता यांच्या राजूनगर प्रभागात आपल्या गरीबाचापाडा प्रभागात एकही रस्ते काम झाले नाही. रस्ते खड्डेमय झाले आहेत. ही कामे करण्यासाठी निधी नाही. या नागरी समस्यांमुळे दररोज नागरिकांच्या रोषाला आपणास आणि प्रभागातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागते. भाजप विषयी प्रभागात नाराजी पसरल्याने लोकप्रतिनिधी म्हणून आपण कमी पडतो असे वाटत असल्याने आपण भाजप सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहोत, असे विकास म्हात्रे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा : “आदित्य ठाकरे दावोसला बर्फात कुणाबरोबर खेळत होते”, नरेश म्हस्के यांचा सवाल

मिळालेली माहिती अशी की, राजू नगर, कुंभारखाणपाडा भागात अनेक बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांवर पालिकेकडून सतत कारवाई केली जाते. ही बांधकामे वाचविण्यासाठी कोणीही भाजप नेता पुढाकार घेत नाही. याउलट शिवसेनेशी संधान असलेल्या मंडळींची बांधकामे जोरात आणि पालिकेकडून कारवाई न होता सुरू असल्याने आर्थिक विवंचनेचा विचार करून हे राजीनामा नाट्य घडले आहे. याविषयी उघडपणे बोलण्यास कोणीही तयार नाही.

हेही वाचा : कल्याण जवळील अटाळी गावात बैलांच्या झुंजीत दोन्ही बैल जखमी, बैल मालकांवर गुन्हा दाखल

“विकास म्हात्रे यांनी आपल्याकडे राजीनामा सुपुर्द केला आहे. तो आपण स्वीकारलेला नाही. हा राजीनामा आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे देणार आहोत. ते अंतिम निर्णय घेतील. पक्षाअंतर्गत लहान कुरबुऱ्या असतात. म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना राजीनाम्यापासून परावृत्त केले जाईल.” – समीर चिटणीस, अध्यक्ष, भाजप डोंबिवली मंडळ.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli bjp leader vikas mhatre resigned from bjp due to insufficient funds for developmental work css
Show comments