डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील कोपर या शिवसेनेच्या प्रभागात शुक्रवारी दोन शिवसैनिकांनी भाजपच्या कमळ चिन्हावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नामोल्लेख असलेल्या घोष वाक्यावर डांबर फासली. या प्रकरणाशी शिवसैनिकांचा संबंध आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना संपर्क करून या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही. जे याप्रकरणात दोषी असतील तर त्यांच्यावर कायद्याने आवश्यक कारवाई करा, असे आदेश देऊन नियमबाह्य कामात आम्ही शिवसैनिकांची पाठराखण करणार नाही, असा सूचक इशारा शिवसैनिकांना दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या अचानकच्या आदेशाने काही वेळ वरिष्ठ पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. कारवाईचे आदेश मिळताच डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी तातडीने सम्राट अनंत गमरे, विशाल कोकाटे यांना अटक केली. एका लोकप्रतिनिधीचा चालक असलेल्या घाऱ्या नावाच्या इसमाने कमळ चिन्हाला काळे फासण्याचे सांगितले असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. लोकसभा निवडणुकीपूर्वीचा प्रचाराचा भाग म्हणून भाजपच्या डोंबिवलीतील कार्यकर्त्यांनी संरक्षित भिंतीवर कमळ चिन्ह काढण्याची मोहीम सुरू केली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोपर प्रभागात भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकार आणि बाजुला कमळाची ५० चिन्ह रेखाटली होती. शुक्रवारी मध्यरात्री सम्राट गमरे, कोकाटे यांनी चिन्हांना काळे फासले. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकाऱ्याने तक्रार केली होती.
हेही वाचा : रेल्वे प्रवासी संघटनांचे ३१ मार्चला ‘भीक मागो’ आंदोलन; कर्जत, कसारा, कल्याण मार्गावर समस्यांचा डोंगर
कोपर हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या प्रभागातून मागील २५ वर्षापासून शिवसेनेचा नगरसेवक निवडून जातो. या प्रभागात कमळ चिन्हाला शिवसैनिकांनी काळे फासल्याने भाजप-शिवसेना युती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात आपल्या कोणत्याही कार्यकर्त्याचा सहभाग नाही हे दाखविण्यासाठी, या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईच्या सूचना पोलीस आयुक्तांंना दिल्या. दाखविण्यास शिंदे गटात मनातून ठाकरे गटात अशा दुहेरी भूमिकेत असलेल्या, भाजपच्या जवळ जाणाऱ्या एका शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकाला हा इशारा असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा : ठाणे लोकसभा कोण लढवणार? भाजपची जम्बो बैठक, शिंदे गटात अस्वस्थता
मागील तीन वर्ष कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपची खडाखडी अनेक विषयांवरून सुरू होती. ही खडाखडी आता कुठे शमली असतानाच, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला कोपरमध्ये कमळ चिन्हाला काळे फासल्याने पुन्हा हा वाद उफाळून येऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरमाईची भूमिका घेऊन या प्रकरणावर पडदा टाकला आहे. स्थानिक भाजप कार्यकर्ते मात्र शिवसैनिकांनी केलेल्या या प्रकराने संतप्त आहेत. या प्रकरणात घाऱ्या नावाचा एका लोकप्रतिनिधीचा वाहन चालक आहे तो या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. त्याच्या अटकेने एका मोठ्या लोकप्रतिनिधीचे नाव पुढे येण्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे.
हेही वाचा : बेकायदा खोलीत शिवसेनेची शाखा? शिळफाटा मार्गावरील बस थांब्यावर बांधकामामुळे प्रवाशांना अडथळा
पंतप्रधान देशाच्या सर्वोच्च पदावरील घटनात्मक व्यक्ती आहे. त्यांच्या नावावर काळे फासणे हे योग्य नाही. एका गटातील कार्यकर्त्यांनी हा केलेला प्रकार निंदनीय आहे.
प्रमोद पाटील, आमदार, मनसे. (कल्याण ग्रामीण)