डोंबिवली : डोंबिवलीतील सागाव येथील नांदिवली पंचानंद भागात इम्प्रेस माॅलसमोरील डाॅन बाॅस्को शाळे पाठीमागे असलेली, सहा भूमाफियांनी गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत एकत्र येऊन उभारण्यात आलेली राधाई बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मंगळवारी दुपारी ही बेकायदा इमारत तोडण्यासाठी पालिकेच्या ई प्रभागाचे तोडकाम पथक, मानपाडा पोलीस घटनास्थळी येताच भाजपच्या महिला, पुरूष पदाधिकाऱ्यांनी कारवाईला विरोध केला. या बेकायदा इमारतीच्या समोर भाजपचे ग्रामीण पदाधिकारी नंदू परब, संदीप माळी, बब्लू तिवारी, महिला पदाधिकारी मनीषा राणे, इतर सुमारे ६० हून अधिक कार्यकर्ते ठाण मांडून होते. तणावपूर्ण वातावरण या भागात निर्माण झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नांदिवली पंचानंद येथील जयेश म्हात्रे आणि इतर दोन भावांच्या वडिलोपार्जित जमिनीवर स्वस्तिक होम्सचे देवेश रवींद्र भगत, उमेश रामदास पाटील या भूमाफियांनी दहशतीचा अवलंब करून तीन वर्षाच्या कालावधीत सात माळ्याची राधाई नावाने बेकायदा इमारत उभारली. जमीन मालक जयेश यांनी या बेकायदा इमारती विरुध्द पालिका आयुक्तांसह ई प्रभागात तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल पालिका अधिकाऱ्यांनी घेतली नाही. जयेश म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी ॲड. सुहास देवकर यांच्या पुढाकाराने दोन वर्षापूर्वी एक याचिका कल्याण डोंबिवली पालिका प्रशासना विरुध्द दाखल केली होती. या याचिकेवर सुनावण्या होऊन न्या. एम. एस. सोनक, न्या. कमल खट्टा यांनी नांदिवली पंचानंद येथील राधाई बेकायदा इमारत जमीनदोस्त करून या कारवाईचा अहवाल १९ जुलै रोजी न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा : डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई; फेरीवाल्यांचे ठेले, मंचकाची तोडफोड

बनावट कागदपत्रे

राधाई या बेकायदा इमारतीला कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाची बांंधकाम परवानगी नाही. महारेराचा बनावट नोंदणी क्रमांक या इमारतीसाठी मिळविण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे या इमारतीमधील सदनिका भूमाफियांनी नियमबाह्य दस्त नोंदणीकरण करून विक्री केल्या आहेत, अशी माहिती याचिकाकर्ते जयेश म्हात्रे यांनी दिली.

बनावट घर खरेदीदार

राधाई इमारतीवर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पालिकेकडून कारवाई होणार असल्याने भूमाफियांनी गेल्या काही दिवसात १५ बनावट रहिवासी या इमारतीत घुसवून या इमारतीत रहिवास आहे असे दाखविण्याचा देखावा पालिकेसमोर उभा केला आहे. उपायुक्त अवधूत तावडे यांनी ही इमारत तोडण्याचे आदेश आपण साहाय्यक आयुक्त जगताप यांना दिले आहेत, असे याचिकाकर्त्याला सांगितले. जगताप यांंनी ही इमारत तोडली जाईल, असे म्हात्रेंना सांगितले. जगताप यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा : कल्याणमधील गोविंदवाडी रस्त्यावरील लोखंडी सळ्या निघाल्याने भीषण अपघाताची भीती

आम्ही बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यास विरोध करत नाहीत. या इमारतीमध्ये कर्ज घेऊन घर घेतलेल्या, कारवाईमुळे बेघर होणाऱ्या रहिवाशांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहोत.

मनीषा राणे (भाजप महिला पदाधिकारी)

पालिकेने कारवाई केली नाहीतर आपण कल्याण डोंबिवली पालिका प्रशासना विरुध्द अवमान याचिका दाखल करणार आहोत.

जयेश म्हात्रे (याचिकाकर्ता)
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli bjp workers oppose for demolition of illegal building at sagaon also neglect hc order css