डोंबिवली: प्रभू रामचंद्र, सितामाई, कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या स्वामी समर्थ आणि ब्राह्मणांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पुरोगामी विचारवंत ज्ञानेश महाराव यांच्या निषेधार्थ गुरूवारी सकाळी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील स्वामी समर्थ मठासमोर ब्राह्मण महासंघ, भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर शासनाने कारवाई करण्याची मागणी केली. संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात विचारवंत महाराव यांनी हिंदू देवदेवता, ब्राह्मणांबद्दल अपशब्द वापरले. त्यांच्या वक्त्तव्याचा निषेध गुरुवारी डोंबिवलीत निदर्शने करून करण्यात आला. स्वामी समर्थ मठाबाहेर यावेळी टाळ मृदुंगाचा गजर करण्यात आला.
स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही राजकीय मंडळी हिंदू देवतांचा अपमान, ब्राह्मण समाजाबद्दल अपशब्द वापरून स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करून अस्वस्थतेचे वातावरण निर्माण करत आहेत. या विकृत प्रवृत्तीला वेळीच जरब बसावी, यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी ही निदर्शने करण्यात आली, अशी माहिती ब्राह्मण महासंघाचे मानस पिंगळे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खा. शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत महाराव हिंदू देवता, ब्राह्मण समाजाबद्दल जाहिरपणे अपशब्द वापरून समाजात तेढ निर्माण करत असल्याची दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. ही ध्वनीचित्रफित पाहून हिंदू धर्मविषयक काम करणाऱ्या अनेक संस्था, संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करून राज्याच्या विविध भागात निदर्शने सुरू केली आहेत.
हेही वाचा : डोंबिवली: कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ जिन्याच्या मार्गात बेकायदा गाळ्यांची उभारणी
या निदर्शनांमध्ये ब्राह्मण सभेचे अध्यक्ष राहुल दामले, शहरप्रमुख राजेश मोरे, स्वामींचे घर संस्थेच्या माधवी सरखोत, ब्राह्मण महासंघाचे मानस पिंगळे, उपाध्यक्ष अनिकेत घमंडी, भाजप प्रदेश नेते शशिकांत कांबळे, भाजपचे कल्याण ग्रामीण प्रमुख नंदू परब, वैभव गायकवाड, महिला आघाडीच्या मनीषा राणे, मितेश पेणकर सहभागी झाले होते.