डोंबिवली: मागील दोन दिवसात कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील नागरिकांनी विविध प्रकारच्या माध्यमातून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविला. डोंबिवली जवळील हेदुटणे गावाजवळ ठाणे, रायगड, पुणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या खिल्लार बैल, बैलगाडांसह एकत्रित येऊन दहशतवादी आणि त्यांच्या भ्याड कृत्याच्या निषेधार्थ उग्र अनोख्या प्रकारचे आंदोलन केले.

बैलांवरील चित्ररुपातून व्यक्त झालेली निषेधाची भावना आणि देशप्रेमाचे संदेश या निषेध आंदोलनाचे मुख्य वैशिष्ट्य होते. यावेळी काटई बदलापूर रस्त्यावरील हेदुटणे गाव हद्दीत खिल्लारी बैलांसह बैलगाडांच्या माध्यमातून निषेध फेरी काढण्यात आली. पाकिस्तान, पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा निषेध करणारी घोष वाक्य बैलांच्या सर्वांगावर लिहिण्यात आली होती. एका बैलाच्या सर्वांगावरील एक बोलक्या चित्राने सर्वांचे मन हेलावून गेले. नुकतेच लग्न होऊन जम्मु काश्मीर येथे आपल्या पतीसह फिरण्यासाठी एक महिला गेली होती. पहलगाम बेसरन टेकड्यांवर मनोरंजनाचा आनंद घेत असताना या महिलेचा पती दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारला गेला. हातावरची ओली मेंदी पाहत, हताशपणे ही महिला आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ खिन्न होऊन बसली आहे. अशाप्रकारचे चित्र रंगवलेल्या खिल्लार बैलाला आंदोलनाच्या अग्रभागी ठेवण्यात आले होते.

अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष व भोपर येथील रहिवासी संदीप माळी यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली जवळील काटई – बदलापूर रस्त्यावरील हेदुटणे गाव हद्दीतील मोकळ्या मैदानांवर या निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. चारही जिल्ह्यातील बैलगाडा संघटनांचे सदस्य आपल्या खिल्लार बैल, बैलगाड्यांसह पहलगाम येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेकरांनी कार्यक्रमस्थळी उग्र आंदोलन केले.

भारत माता की जय, जय श्रीराम, हिंदुस्थान झिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी बैलगाडा संघटनाच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणाणुन सोडला होता. या हल्ल्यामागे पाकिस्तानच आहे. त्यामुळे हल्लेखोर दहशतवाद्यांना शोधुन काढून त्यांना कोणतीही दयामाया न दाखविता ठेचून काढा, अशा मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या. बैलगाडा, दहशतवादाचा धिक्कार करणारे चित्रमय सजवलेले खिल्लार बैल पाहण्यासाठी डोंबिवली, २७ भागातील नागरिकांनी गर्दी केली होती.