डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयाजवळील दोन पाण्याच्या टाक्यांच्या जवळील रस्त्या लगतच्या भुयारी गटारांवरील झाकणे तुटली आहेत. काही झाकणे गटारात अडकून पडली आहेत. या झाकणांमुळे या भागात अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उमेशनगरमधील दोन पाण्याच्या टाक्यांजवळील भाग हा सर्वाधिक वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या भागातून गरीबापाचापाडा, उमेशनगर, महाराष्ट्रनगर, सुभाषचंद्र बोस रस्ता, महात्मा फुले रस्ता, रेतीबंदर रस्ता भागातील वाहने धावतात. माणकोली उड्डाण पुलाकडे जाणारी बुहतांशी वाहने याच रस्त्यावरून येजा करतात.

या रस्त्याच्या कडेला असलेल्या भुयारी गटार योजनेवरील झाकणे अवजड वाहनांनी फुटली आहेत. ही फुटलेली झाकणे आहे त्याच स्थितीत भुयारी गटारावर पडून आहेत. या भागात वाहतूक कोंडी झाली की अनेक दुचाकी स्वार या गटारांवरील झाकणांवरून प्रवास करतात. गटारातून लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. रात्रीच्या वेळेत ही तुटलेले झाकणे, लोखंडी सळ्या वाहन चालकाच्या निदर्शनास आल्या नाहीत तर मोठा अपघात याठिकाणी होण्याची भीती या भागातील रहिवासी राजू जोशी यांनी व्यक्त केली.

या परिसरातून सीमेंट काँक्रीटचे मिक्सर, अवजड वाहने धावत असतात. अशा वाहनाचे चाक या भुयारी गटारात अडकले तर या वाहनांच्या पाठीमागून येणाऱ्या वाहनांना अपघात होऊ शकतो. अरूंद रस्त्यावरील भागात ही गटारांची झाकणे तुटली आहेत. काही झाकणे अर्धी गटारात काही भाग गटाराच्या वरती अशा स्वरुपात आहेत. रस्त्याने एकावेळी दोन वाहने आली. पादचारी रस्त्याच्या बाजुला गेला की त्यांना या भुयारी गटारावरील तुटलेल्या झाकणांचा आधार घेऊन उभे राहावे लागते.

पालिकेने या तुटलेल्या झाकणांच्या भागात कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. पालिका अधिकाऱ्याने सांगितले, शहरातील भुयारी गटारावरील तुटलेली झाकणे बदलण्याचे काम सुरू आहे. काही भागात अद्याप गटारे पूर्ण व्हायची आहेत. त्यामुळे त्या भागातील तुटलेल्या गटारांवर झाकणे बसविताना अडथळे येत आहेत. उमेशनगरमधील तुटलेली झाकणे सुस्थितीत करण्याची कार्यवाही केली जाईल.