डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली मशाल चौक येथे सोमवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या दरम्यान डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटातील २० ते २४ जण एकमेकांना भिडल्याने शिवीगाळ, मारहाण, दगडफेक, काचा फेकून एकमेकांना जखमी करण्यात आले. या हाणामारीच्यावेळी काही वाहनांचे नुकसान झाले. या हाणामारी प्रकरणी दोन्ही गटांनी रामनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दोन्ही गटाच्या एकूण ४४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे, असे रामनगर पोलिसांनी सांगितले. दाखल दोन्ही गुन्ह्यांच्या बाजुने तपास सुरू करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
डोंबिवली पूर्वेतील हनुमाननगर प्लाझ्मा रक्तपेढीसमोरील परिसरात राहणारा फलक छपाई व्यावसासिक आतिश उबाळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमोल केदार, अशोक केदार, सुमित ढेपे, लोकश कुसाळकर, योगेश आणि इतर २० जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पूर्व भागातील वल्लभभाई पटेल रस्त्यावरील इंदिरानगर भागात राहणाऱ्या सुमित ढेपे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजेश भालेराव, भरत भालेराव, प्रदीप ढवळे, अनिल पाईकराव, अभिषेक धेडे, करण कांबळे, सोजर भालेराव, कविता ढवळे, पुजा भालेराव आणि इतर २४ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
आतिश उबाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे, की सोमवारी मध्यरात्री अमोल, अशोक केदार आणि इतर २० जण शेलार नाक्यावरील डाॅ. आंंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालण्यासाठी आले होते. त्यावेळी अमोल केदार यांनी राजेश भालेराव, प्रदीप ढवळे यांना धक्का मारून त्यांच्या मधून पुढे गेले. याप्रकरणाचा जाब विचारण्यासाठी कविता ढवळे इतर महिलांसह केदार आणि साथीदारांना जाब विचारण्यासाठी गेल्या. तेथे त्यांच्यावर दगड, काचा फेकण्यात आल्या. आपण कविता यांना वाचविण्यासाठी गेलो. तेव्हा आपणासह शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, बांबुने मारहाण करण्यात आली. म्हणून आपण अमोल, अशोक केदार यांच्यासह २० जणांविरुध्द तक्रार करत आहोत.
सुमित ढेपे यांनी तक्रारीत म्हटले आहे, की आम्ही डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी गेलो. तेव्हा आपणास राजेश भालेराव, भरत भालेराव, प्रदीप ढवळे आणि इतर १५ जणांनी पुतळ्याला हार घालण्यास विरोध केला. आमच्या सोबत हुज्जत घालून धक्काबुक्की करून आम्हाला तेथून हुसकावून लावले. त्यानंतर प्लाझ्मा रक्तपेढी समोरील आमच्या परिसरात येऊन आमच्यासोबत वाद घालून गाड्यांची तोडफोड केली. तसेच आम्हाला शिवीगाळ करत धमकी देऊन पळून गेले.
हा हाणामारीचा प्रकार सुरू असताना तेथून पोलीस वाहन जात होते. पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी घटनास्थळी येऊन दोन्ही गटांना शांत केले.