डोंबिवली : डोंबिवली परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारा, दहाहून अधिक गंभीर गु्न्हे दाखल असलेला येथील स. वा. जोशी शाळे जवळील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीतील अक्षय किशोर दाते (२२) या धोकादायक गुन्हेगार असलेल्या गुंडाला डोंबिवली पोलिसांनी एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे. एक वर्षासाठी त्याची रवानगी बुधवारी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात करण्यात आली आहे.
अक्षयवर दहशत माजविणे, चाकूचा धाक दाखवून लुटणे, जीवे ठार मारणे अशा प्रकारचे एकूण १० गंभीर गुन्हे डोंबिवलीतील पोलीस ठाण्यात दाखल आहेत. विविध गुन्ह्यांत अक्षयला अटक करून तुरुंगात पाठविण्यात आले होते. तेथून बाहेर आल्यावर तो नेहमी गुन्हेगारी कारवाया करत होता. पोलिसांनी त्याला वारंवार सुधारण्याची संधी दिली होती. तरीही तो पोलिसांना जुमानत नव्हता. पोलिसांनी त्याला ठाणे, मुंबई जिल्ह्यातून तडीपार केले होते. तो वांगणी भागात राहत होता. पोलिसांना चकवा देऊन तो डोंबिवली परिसरात येऊन गुन्हेगारी करत होता.
हेही वाचा : डोंबिवलीत मोबाईल चोरणारा सुरक्षा अधिकारी अटकेत
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये डोंबिवली पूर्वेतील चिमणीगल्ली भागात धारशिव जिल्ह्यातील हर्षद सरवदे (४१) हे चहा पित उभे होते. तेथे तडीपार गुंड अक्षय दाते आला. त्याने सरोदे यांना तु मला काळ्या का बोललास, म्हणून मारहाण केली. त्यांना चाकुचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. इतर पादचारी सरोदे यांना सहकार्य करण्यास पुढे आले तर त्यांनाही अक्षयने चाकूचा धाक दाखविला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा : ठाण्यात दिशादर्शक, नो पार्किंग फलकांची चोरी; वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली
अक्षय दाते हा डोंबिवलीतील धोकादायक इसम असल्याने त्याला शहरात ठेवणे धोकादायक आहे. हा विचार करून अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त सचीन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी अक्षयला एक वर्ष स्थानबध्द करण्याचा निर्णय घेतला. फरार असलेल्या अक्षयला वांगणी भागातून पोलिसांनी ताब्यात घेऊन कोल्हापूर येथील कळंबा मध्यवर्ति कारागृहात त्याची रवानगी केली. या कारवाईत साहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, हवालदार देविदास पोटे, सुनील भणगे, विशाल वाघ, शरद रायते, दिलीप कोती, अनंत डोके, निसार पिंजारी, शिवाजी राठोड यांच्या पथकाने केली.