डोंबिवली: शिवसेनेचे (शिंदे गट) युवासेना प्रदेश सचिव आणि कल्याण डोंबिवली पालिकेचे माजी स्थायी समिती सभापती दिपेश पुंडलिक म्हात्रे यांना ‘तुमची अवस्था महेश गायकवाड यांच्यासारखी करू’, अशाप्रकारच्या धमक्या संबंधित पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. अशाप्रकारे धमक्या देऊन आपणास ठार मारण्याचा इशारा देण्यात आला आहे, अशी तक्रार शिवसेना युवासेना सचिव दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे. पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात प्रदेश सचिव दिपेश म्हात्रे यांनी म्हटले आहे, गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली विधानसभा मतदारसंघात काही मंडळी पक्षाच्या नावाखाली दहशत माजवून समाजात दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही दिवसांपूर्वी संबंधित पक्षाच्या काही लोकांनी आपल्या मोबाईल व्हाॅट्सप स्थापित स्थानावर (स्टेटस) ‘आम्हाला गणपत गायकवाड व्हायच नाही,’ ‘तुमची अवस्था महेश गायकवाड यांच्यासारखी करू,’ अशा धमकीवजा इशारा देणारे संदेश ठेवले होते. या संदेशाच्या माध्यमातून आपणास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.
हेही वाचा : कल्याणमधील १६५ रस्ते बाधितांमधील पाच लाभार्थींना मिळाली २४ वर्षांनी घरे
म्हात्रे पोलीस ठाण्यात
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुक्रवारी झालेल्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री उल्हासनगरच्या जाॅली प्रिंटर्सच्या मालकाने ‘२० सप्टेंबर, हॅप्पी खड्डे, डोंबिवलीकर’ असे फलक डोंबिवलीत लावले होते. या फलकांच्या माध्यमातून मंत्री चव्हाण यांची बदनामी, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि शहराचे विद्रुपीकरण करण्यात आले होते. याप्रकरणी भाजप कार्यकर्ते विनय पालव यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी जाॅली प्रिंटर्सच्या मालकाविरुध्द गुन्हा दाखल केला होता. छपाईदाराने दिपेश म्हात्रे यांच्या सूचनेवरून फलक छापल्याची कबुली पोलिसांना दिली होती.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी बुधवारी सकाळी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपविजय भवर यांनी दिपेश यांना फलक प्रकरणातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी विष्णुनगर पोलीस ठाण्यात बोलविले होते. उपस्थित न राहिल्यास अटकेचा इशारा दिला होता. बुधवारी सकाळी म्हात्रे विष्णुनगर पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यांचे म्हणणे लिखित स्वरुपात पोलिसांना दिले. मोठागाव मधून म्हात्रे आपल्या सुमारे ४०० हून अधिक समर्थक कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्यांवर कोंडी झाली होती.
हेही वाचा : सामासिक अंतर न सोडता डोंबिवलीतील नवापाड्यात आठ माळ्याच्या बेकायदा इमारतीची उभारणी
डोंबिवलीत खड्डे प्रकरणावरून लावलेल्या फलक प्रकरणात आपले नाव तपासा दरम्यान पुढे आल्याची माहिती आहे. या तपास कामासाठी आपणास पोलिसांनी बोलविले आहे. पोलिसांना आपले लेखी उत्तर दिले आहे. शहरात खड्डे पडले आहेत ही वस्तुस्थिती आहे. डोंबिवली विधानसभेत दडपशाही सुरू आहे. त्याला आम्ही भीक घालत नाही. आमचे काम आम्ही करत राहणार. विधानसभा निवडणुकीच्यावेळी लोक योग्य निर्णय घेऊन आपणास न्याय देतील.
दिपेश म्हात्रे (युवासेवा प्रदेश सचिव, शिवसेना)