कल्याण : डोंबिवली (पूर्व) ग प्रभाग क्षेत्रातील निवासी व वाणिज्य विषयक मालमत्तांचा कर विकासक आणि इतर थकबाकीदारांनी थकवल्याने कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभागाने संबंधितांच्या 26 लाख 31 हजाराच्या मालमत्ता गुरुवारी सील केल्या. या कर थकबाकीदारांना पालिकेने वारंवार नोटीस देऊन कर भरण्याची मागणी केली होती.

महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार आणि कर निर्धारण व संकलक विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग प्रभागाचे सहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत, अधिक्षक ज्ञानेश्वर कंखरे, वरिष्ठ लिपिक नरेश म्हात्रे, लिपिक रामचंद्र दळवी यांनी ही कारवाई केली.

या कारवाई अंतर्गत डोंबिवली (पूर्व) पांडुरंगवाडी येथील गणेश सिद्धी इमारतीमधील ब्लॉक क्र. ३०१ व ४०१ हे २, लाख ४१, हजार ६९१ रुपये इतक्या थकबाकीमुळे सील करण्यात आले. तसेच ओम शिवगणेश सोसायटीतील विकासक पी.एस. म्हात्रे यांचे कार्यालय २६ लाख ३१, हजार ७०५ रुपये रकमेच्या थकबाकीमुळे सील करण्यात आले, अशी माहिती सहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी दिली.

दरम्यान महापालिकेच्या या कठोर कारवाईमुळे अन्य थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे असे कुमावत यांनी सांगितले.

Story img Loader