डोंबिवली : घराच्या बाहेर मालकाने फिरण्यासाठी मोकळी सोडलेली कुत्र्याची पिल्ले अंगावर भुंकली म्हणून गुरुवारी पहाटे डोंबिवली जवळील भोपर देसलेपाडा भागात परिसरातील दोन जणांनी पाळीव कुत्र्यांचा सांभाळ करणाऱ्या मालकाला बेदम मारहाण केली आहे. मारहाण करणारा एक कराटे पटू आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात मालकाने दोन जणांविरूध्द तक्रार केली आहे.
कराटेपटू अभिषेक गणपत पेंडूरकर (४०), निखील विश्वनाथ जाधव (२६) अशी आरोपींची नावे आहेत. ते देसलेपाडा भागातील मयुरेश्वर मंदिर, लोढा हेरिटेज भागात राहतात. इक्बाल शहा (४९) असे कुत्र्यांचा सांभाळ करणाऱ्या मालकाचे नाव आहे. ते रिक्षा चालक आहेत. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार इक्बाल यांनी गुरुवारी पहाटे आपल्या पाळीव कुत्र्यांना घराच्या बाहेर फिरण्यासाठी सोडले होते. यावेळी इक्बाल आपल्या रिक्षेवरील संरक्षित कापड काढण्यात मग्न होते. या कालावधीत आरोपी अभिषेक, निखील त्या भागातून जात होते. यावेळी फिरण्यास सोडलेली कुत्री अचानक निखील, अभिषेक यांच्यावर भुंकू लागली.
हेही वाचा : ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी ठप्प, महास्वयंम पोर्टलचा सर्व्हर संथगती
कुत्री भुंकत असताना मालक इक्बाल यांनी त्यांना आवरले नाही. त्यामुळे आपणास नाहक मनस्ताप याचा राग मनात ठेऊन दोन्ही आरोपींनी इक्बाल यांना ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जवळील धारदार तलवारीसारखे शस्त्र घेऊन ते इक्बालच्या अंगावर मारण्यासाठी धाऊन आले. इक्बाल यांनी धावत जाऊन घरात आसरा घेतला. दोघांनी त्यांचा पाठलाग केला. इक्बाल यांच्या बंद घराचा दरवाजा लाथाबुक्क्यांनी तोडून घरात प्रवेश केला.
हेही वाचा : ठाण्यात भाडेतत्वावरील सदनिकांमध्ये घुसखोरी सुरुच, ५१ घुसखोरांना बाहेर काढून सदनिकांना महापालिकेचे टाळे
घरात घुसून अभिषेक, निखील यांनी इक्बाल याच्यासह त्याच्या पत्नीला मारहाण केली. तेथून ते पळून गेले. मानपाडा पोलिसांनी इक्बाल यांची तक्रार दाखल करून घेतली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी तपास करत आहेत. तलवारीसारखे शस्त्र आरोपींनी जवळ का बाळगले होते. ते कुठे घेऊन चालले होते, याची माहिती पोलीस काढत आहेत.