डोंबिवली : डोंबिवलीतील सर्वाधिक वर्दळीच्या घरडा सर्कल येथील चौकात रस्ते कामाची खडी पडल्याने या ठिकाणी दुचाकी चालक घसरुन पडण्याचे प्रमाण वाढले होते. ही खडी सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजुलाच केलेल्या रस्ते कामाची होती. खडी रस्त्यावर पसरल्याची आणि दुचाकीस्वार घसरुन पडत असल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ही खडी चौकातून बाजुला करण्यास सुरुवात केली. डोंबिवलीतील बहुतांशी नोकरदार स्थानिक पातळीवर जाण्यासाठी दुचाकीचा उपयोग करतात.

घरडा सर्कल हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरुन दुचाकीने येजा करणारे महिला व पुरुष हे खडीवरुन घसरुन पडत होते. एका डाॅक्टरला या अपघातात दुखापत झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पेंढरकर महाविद्यालय ते घरडा सर्कल रस्त्याचे अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण केले. हे काम करत असतानाच घरडा सर्कल चौकातील गोलाकार रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण करणे आवश्यक होते, अशी प्रवाशांची मागणी होती. हा चौक पालिकेच्या अखत्यारित येत आहे. घरडा सर्कल वाहतूक बेटाचा आकार कमी करण्याच्या वाहतूक विभागाच्या सूचना आहेत.

हेही वाचा : ठाणे, पालघरमधील लोकसभेच्या चारही जागा मनसे लढणार

हेही वाचा : हत्येप्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, दोन गुन्हे दाखल

घरडा सर्कल चौकातील खडीमुळे अपघात घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पालिकेकडे केल्या जात होत्या. पालिकेकडून ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पराळे राव यांनी तातडीने पुढाकार घेऊन घरडा सर्कल चौकातील रस्त्यावर पडलेली खडी मजुरांच्या साहाय्याने बाजुला करुन घेतली. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहने आता सुसाट जात आहेत.

Story img Loader