डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर मधील रेल्वे मैदानाजवळील रस्ता पंधरा दिवस बंद ठेऊन कल्याण डोंबिवली पालिकेने या रस्त्याची सिमेंट काँक्रीटने बांधणी केली. हा नवाकोरा काँक्रीटचा रस्ता वाहतुकीसाठी शुक्रवारी खुला करण्यात आला. या रस्त्याच्या बांधणीत काही तांत्रिक अडचणी आल्याने ठेकेदाराने हा रस्ता पुन्हा खोदून ठेवल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या खोदलेल्या रस्त्यामुळे या भागात पुन्हा वाहन कोंडी सुरू झाली आहे. निकृष्ट दर्जाचे काँक्रीट रस्त्याचे काम करणाऱ्या या रस्ते ठेकेदारावर पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, शहर अभियंता अनिता परदेशी यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. गणेशनगर मधील रेल्वे मैदानाकडे जाणारा रस्ता खड्डेमय झाल्याने काही महिन्यापूर्वी या भागातील रस्त्याच्या एका बाजू काँँक्रीटची करण्यात आली. दुसऱ्या बाजुच्या मार्गिकेचे काम गेल्या मागील पंधरा दिवसाच्या कालावधीत ठेकेदाराने पूर्ण केले.
हेही वाचा : ठाणे – बेलापूर वाहतूक कोंडी, घणसोली स्टेशन समोर ट्रक पलटी
गेल्या शुक्रवारी ठेकेदाराने रखडलेल्या रस्त्याच्या ३० फूट लांबीच्या काँक्रीट मार्गिकेचे काम पूर्ण केले. या रस्त्यावरून शुक्रवारी रात्री वाहने जाऊ लागली. या रस्ते मार्गात एक समतलपणा नसल्याच्या तक्रारी वाहन चालकांकडून करण्यात येत होत्या. दिवसा, रात्री ठेकेदाराचे कामगार हे काम करत होते. हा रस्ता मूळ रस्त्याशी एक समतल नसल्याने वाहन चालकांना गतिरोधक ओलांडून मग मुख्य रस्त्यावर जावे लागते. हे गतिरोधक काढून मग ठेकेदाराने या रस्ते मार्गात समतलपणा आणणे गरजेचे होते. ते काम त्याने केले नाही, अशा तक्रारी आहेत.
हे काम सुस्थितीत केल्या शिवाय या कामाचे देयक आणि या कामाची मोजणी केली जाणार नाही, अशी तंबी पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याने ठेकेदाराने घाईघाईने नवाकारो रस्ता पुन्हा उखळणी यंत्राने खोदण्यास सुरूवात केली आहे. नवाकोरा रस्ता खोदण्यात येत असल्याने करदात्या पैशांची ही उधळपट्टी आहे, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
हेही वाचा : माणकोली पुलावरील वाहन संख्या वाढल्याने डोंबिवलीतील रेतीबंदर रेल्वे फाटकात वाहनांच्या रांगा
गणेशनगर वाहतूक पोलीस चौकी ते रेल्वे मैदाना दरम्यानचा २० फुटाचा रस्ता खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागते. हा रस्ता नवीन रस्ते बांधणीत पूर्ण करणे आवश्यक होते. परंतु, हा रस्ता रखडलेल्या स्थितीत सोडून देण्यात आल्याने पालिकेच्या कामाविषयी नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा : भिवंडीतून ‘हायवे राॅबर’ ताब्यात, पिस्तुल, मिरचीपूडसह शस्त्रास्त्र जप्त
शहरात नियोजनशून्य पध्दतीने सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची शहर अभियंता अनिता परदेशी यांनी पाहणी करून निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांंवर कारवाईचा बडगा उभारण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अधिक माहितीसाठी डोंंबिवलीचे कार्यकारी अभियंंता मनोज सांगळे यांना संंपर्क साधला. ते एका पाहणी दौऱ्यात असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.