डोंबिवली : येथील पश्चिमेतील गणेशनगर भागातील वीर जिजामाता छेद रस्ता ते बावनचाळ रेल्वे मैदानापर्यंतच्या रखडलेल्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पालिकेने सुरू केले आहे. या रस्त्याच्या एका भागाचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले होते. दुसऱ्या बाजुच्या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून हाती घेण्यात आल्याने नवापाडा, गरीबीचापाडा, कुंभारखाणापाडा, देवीचापाडा, राजूनगर भागातून ठाकुर्ली पुलाकडे जाणाऱा रस्ते कामासाठी गेल्या चार दिवसांंपासून बंद करण्यात आला आहे.
गणेशनगर मधील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या वाहतूक नियंत्रक चौकी जवळील रस्ता खराब झाल्याने गेल्या महिन्यात या रस्त्याच्या एका बाजुचे काँक्रीटीकरणाचे काम पालिकेने पूर्ण केले. दुसऱ्या बाजुच्या खराब रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होत नसल्याने प्रवाशांना खड्ड्यातून प्रवास करत लागत होता. या खड्ड्यांमुळे या भागात दररोज वाहतूक कोंडी आणि वाहन वर्दळीमुळे धुळीचे लोट पसरत होते. परिसरातील रहिवासी या धुळीमुळे हैराण होते. या रस्त्याच्या रखडलेल्या एका बाजुच्या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे म्हणून प्रवासी, या भागातील नागरिकांची मागणी होती. माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी रखडलेला रस्ता लवकर पूर्ण करा म्हणून पालिका अभियंते, ठेकेदार यांच्या मागे तगादा लावला होता. गेल्या गुरुवारी या रस्त्याचे काम ठेकेदाराने सुरू केले.
हेही वाचा : डोंबिवलीत दामदुप्पटच्या आमिषाने ज्येष्ठांची फसवणूक
हे काम सुरू करण्यापूर्वी राजूनगर भागातील हनुमान मंदिर, नवापाडा, कुंभारखाणपाडा, एकविरा पेट्रोल पंप भागात गणेशनगर रेल्वे मैदानाकडे जाणारा रस्ता काँक्रीट कामासाठी बंद अशी सूचना मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर लावणे हे पालिका अधिकारी आणि ठेकेदाराचे काम होते. पण हे फलक न लावल्याने अनेक वाहन चालक गणेशनगर भागातून जातात. तेथे रस्ता बंद असल्याचे समजल्यावर तेथून पाठीमागे येऊन पुन्हा नवापाडा, सुभाष रस्ता, रेल्वे स्थानक रस्त्याने इच्छित स्थळी जातात. रखडलेल्या रस्ते भागात गणेशनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची एक मार्गिका मात्र सुरू ठेवण्यात आली आहे. सरसकट सर्वच वाहने या भागात रस्ते बंदची कोणतीही सूचना नसल्याने एकावेळी रस्ते काम सुरू असलेल्या भागात जातात. तेथे दररोज संध्याकाळी वाहन कोंडी होते. अनेक वाहन चालक नवापाडा, चिंचोड्याचा पाडा भागातील अंतर्गत गल्ली बोळातील रस्त्याने सुभाष रस्ता भागात येतात. तेथून इच्छित स्थळी जातात.
ठाकुर्ली पुलाकडून येणाऱ्या वाहनांसाठी ठेकेदाराने रेल्वे मैदानाजवळ राजूनगर, गणेशनगर, नवापाडा, देवीचापाडा, गरीबाचापाडा भागात जाणाऱ्या वाहनांसाठी रस्ता बंद आहे असा फलक लावणे आवश्यक आहे. आता चार दिवस उलटूनही ठेकेदाराने त्या ठिकाणी फलक न लावल्याने रस्ते काम सुरू असल्याच्या ठिकाणी दररोज सकाळ, संध्याकाळ कोंडी होत आहे. नोकरदार प्रवाशांना रस्ते बंदचा सर्वाधिक फटका बसत आहे. सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. या रस्ते मार्गाने जाणाऱ्या विविध शाळांच्या बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे पालकांना इतर रस्त्यांवर जाऊन शालेय बसमधून येणाऱ्या मुलांना ताब्यात घ्यावे लागते.