डोंबिवली : गेल्या आठवड्यात ठाकुर्ली येथील नेहरू रस्त्यावरील वालजी इस्टेट इमारती समोरील एका अशोकाच्या झाडावर ज्वलनशील रसायनाचा वापर करून संबंधित जिवंत झाड जाळून टाकण्यात आले आहे. वर्दळीच्या रस्त्यावरील शोभिवंत दिसणारे अशोकाचे झाड अचानक वाळल्याने या भागातील जागरूक नागरिकाने कल्याण डोंबिवली पालिकेत तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन उद्यान विभागाचे मुख्य अधीक्षक संजय जाधव यांनी अशोकाच्या झाडा जवळील वालजी इस्टेट सोसायटीच्या अध्यक्ष, सचिवांना नोटीस पाठवून संबंधित अशोक वृक्ष कोणाच्या परवानगीने जिवंत मारला, असा प्रश्न करून येत्या सात दिवसांत याप्रकरणी खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे.
हेही वाचा : दिघा स्थानकाला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद, अवघ्या पाच दिवसांत १ लाख ३२ हजार प्रवाशांचा प्रवास
ठाकुर्ली रेल्वे स्थानक पूर्व बाजुला उड्डाण पुलाच्या बाजुला वालजी इस्टेट नवीन सोसायटी झाली आहे. या सोसायटीच्या समोर अशोकाचे सात ते आठ वर्षाचे देखणे हिरवेगार झाड होते. हे झाड गेल्या आठवड्यात अचानक वाळून गेले. या झाडाची पाने सुकून गेली. या झाडा लगतची इतर झाडे हिरवीगार आणि अशोकाचे झाड मात्र वाळल्याने ठाकुर्लीतील पर्यावरणप्रेमी नागरिक ज्ञानेश्वर पगारे यांंनी याप्रकरणी पालिकेच्या उद्यान विभागात तक्रार करून अशोकाच्या जिवंत झाडावर ज्वलनशील रसायनाचा वापर करून त्याला जिवंत मारणाऱ्या इसमांचा शोध घेण्याची मागणी केली. या झाडाच्या बाजुला काही मंडळी चारचाकी वाहने उभी करतात. त्यांना अशोकाचे जिवंत झाड अडथळा येत होते. त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय तक्रारदार पगारे यांनी व्यक्त केला होता.
हेही वाचा : कल्याण मधील शेतकऱ्याची वन विभागात नोकरी लावतो सांगून फसवणूक
हे झाड वालजी सोसायटीच्या समोरील भागात होते. हा विचार करून उद्यान विभागाने सोसायटीच्या अध्यक्ष, सचिवांना नोटीस बजावली आहे. पालिका हद्दीत सुमारे तीन लाखांहून अधिक झाडे आहेत. या झाडांचे संवर्धन, संरक्षण करण्याची जबाबदारी नागरिकांबरोबर पालिकेची आहे. त्यामुळे पालिकेने या जिवंत झाड प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. या नोटिसला सोसायटीने उत्तर दिले नाही तर कारवाई करण्याचा इशारा अधीक्षक जाधव यांनी दिला आहे.