डोंबिवली – सासु, सुना एकाच घराच्या, तिजोरीच्या मालकिणी. पण डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीमध्ये आपल्या सुनेने सात लाख ९१ हजार रूपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे. या चोरीसाठी आपल्या सुनेला तिच्या मित्राने मदत केली आहे, अशी तक्रार सासुने आपल्या सून आणि तिच्या मित्रा विरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात केली आहे.

या महिलेची ३५ वर्षाची सून सातारा जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहे. तिच्या मित्राचा पत्ता आपणास माहित नसल्याचे सासुने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. चोरीस गेलेल्या सोन्याच्या ऐवजांमध्ये दोन मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या, राणी हार, गंठण, सोन्याचा हातामधील कड असे एकूण सोन्याचे ११ ऐवज चोरीला गेले आहेत. गेल्या फेब्रुवारीमध्ये दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे, असे सासुने तक्रारीत म्हटले आहे.

रामनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत सासुने म्हटले आहे, की फेब्रुवारीमध्ये मी आणि सून घरात होतो. दुपारच्या वेळेत सुनेने आपणास आपण बँकेत पैसे काढण्यासाठी जातो असे सांगितले. ती घरातून तिच्या मित्रासह निघून गेली. त्यानंतर आपण घरातील कपाटातील तिजोरी पाहिली असता त्या तिजोरीत ठेवलेले सात लाख ९१ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसले. दागिन्यांचा कपाटातील विविध भागात, घरात शोध घेतला ते कोठे आढळुन आले नाहीत.

घरात बाहेरून कोणीही आलेले नाही. घरात चोरी झालेली नाही. त्यामुळे दागिने चोरी होण्याचा प्रश्न येत नसल्याने घरातच हे दागिने चोरीला गेले असल्याचा संशय व्यक्त करून सासुने हे दागिने आपली सून आणि तिच्या मित्राने संगनमत करून चोरले असल्याचा संशय व्यक्त केला. या चोरी प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमिला कावळे यांनी याप्रकरणाचा तपास करून सून आणि तिचा मित्र यांच्या विरुध्द सात लाख ९१ हजार रूपयांच्या सोने ऐवज चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला.