डोंबिवली : नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या डोंबिवलीतील चैत्र पाडव्याला निघणारी नववर्ष स्वागत यात्रा यावेळी रामराज्य आणि मानवी मूलभुत मुल्ये ही संंकल्पना घेऊन काढण्यात येणार आहे. श्री गणेश मंदिर संस्थानच्या माध्यमातून स्वागत यात्रा संयोजन समितीच्या शनिवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळच्या स्वागत यात्रेचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्जवल निकम यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ९ एप्रिल रोजी चैत्र पाडव्याच्या दिवशी आणि त्याच्या चार दिवस अगोदर भरगच्च धार्मिक कार्यक्रम गणेश मंदिरात असणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्री गणेश मंदिर संस्थाचे हे शतकोत्तर महोत्सवी वर्ष सुरू आहे. त्यामुळे यावर्षीची स्वागत यात्रा आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरी करण्यात येणार आहे. अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्याचा जल्लोष देशभर साजरा केला जात आहे. या आनंदप्रीत्यर्थ रामराज्य आणि मानवी मूलभुत मूल्य यावर आधारित स्वागत यात्रेतील चित्ररथ सजविले जाणार आहेत.

हेही वाचा : उत्तरप्रदेशातील अमली पदार्थांचा कारखाना ठाणे पोलिसांकडून उद्ध्वस्त, सुमारे दीड महिने पोलिसांची मजूर बनून रेकी

नववर्ष स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर गणेश मंदिरात डोंबिवलीतील शहरातील विविध पातळ्यांवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची एकत्रित बैठक शनिवारी आयोजित केली होती. ११० संस्थांचे सदस्य यावेळी उपस्थित होते. या बैठकीत संस्थानचे विश्वस्त राहुल दामले, उपाध्यक्ष सुहास आंबेकर, कार्यवाह प्रवीण दुधे, सहकार्यवाह डाॅ. उत्कर्ष भिंगारे, खजीनदार राजय कानिटकर, व्यावसायिक श्रीपाद कुळकर्णी, संयोजन समिती प्रमुख दत्ताराम मोंडे उपस्थित होते.

हेही वाचा : शहापूर जवळील किन्हवली खरांगण परिसरात बिबट्याचा संचार

श्री गणेश मंदिराच्या पुढाकाराने आणि विविध संस्थांच्या सहकार्याने काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा २६ वे वर्ष आहे. गणेश मंदिराचा शतकोत्तरी महोत्सव सुरू आहे. त्यामुळे अधिक जल्लोषात स्वागत यात्रा काढण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. नेहमीप्रमाणे गणेशाची पालखी, ढोल ताशा, झांज पथके, सामाजिक संदेश देणाऱ्या वाहनांच्या फेऱ्या स्वागत यात्रेत असतील. मराठी कलाकार स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत. स्वागत यात्रेसंदर्भातची पुढील बैठक ३० मार्च रोजी गणेश मंदिरा आयोजित करण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli gudi padwa 2024 procession senior advocate ujjwal nikam chief guest css