डोंबिवली जवळील २७ गाव हद्दीतील एका बेकायदा भंगाराच्या गोदामाला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. आग लागताच या ठिकाणी कार्यरत असलेले कामगार पळून गेले. त्यामुळे जीवित हानी टळली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग पसरण्यापूर्वीच आग आटोक्यात आणली. दावडी परिसरात मोकळ्या जमिनींवर भंगार विक्रेत्यांनी पत्र्याचे निवारे उभारून भंगाराची गोदामे सुरू केली आहेत. स्थानिकांनी आपल्या जमिनी भाड्याने देऊन ही बेकायदा गोदामे सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. या गोदामांच्या माध्यमातून पालिकेला एक पैशाचा कर मिळत नाही.
हेही वाचा : घोडबंदर भागात ४०० ते ५०० वृक्षतोड ? कत्तल झालेल्या वृक्षांमध्ये हेरिटेज वृक्षांचा समावेश असल्याचा संशय
आग शाॅर्ट सर्किटमुळे किंवा लोखंडी सामान फोडत असताना उडालेल्या ठिणगीतून लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भंगार नेण्यासाठी ट्रक गोदामात आले होते. चालकांनी तत्परता दाखवून ट्रक आग लागताच गोदामातून बाहेर काढले. आठ वर्षापूर्वी या भागात भंगार गोदामाला भीषण आग लागली होती. पालिका, पोलीस या बेकायदा गोदामांवर कारवाई करत नसल्याने त्याचा गैरफायदा स्थानिक जमीन मालक, भंगार विक्रेते घेत आहेत.