डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवलीत अग्निदेव मंदिराच्या बाजुला पायवाट बंद करून भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे. या इमारतीला सामासिक अंतर नाही. इमारतीत जाण्यासाठी समोर प्रशस्त जागा नसल्याने भूमाफियाने एका गाळ्यामधून रहिवाशांना इमारतीत येजा करण्यासाठी रस्ता ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.

ही बेकायदा इमारत सात माळ्याची असुनही या इमारतीला पाच माळ्यापर्यंत उद्ववाहनची सुविधा करण्यात आली आहे. जुनी डोंबिवलीतील विघ्नेश्वर कृपा आणि उदयराज या अधिकृत इमारतींच्या मध्यभागी पायवाट बंद करून प्रकाश गोठे, शंकर ठाकूर या भूमाफियांनी या बेकायदा इमारतीची उभारणी केली आहे. या बेकायदा इमारतीमधील सदनिका २८ ते ३५ लाख रूपयांना नोटरी पध्दतीने घर खरेदीदारांना विकण्यात येत आहेत. या बेकायदा इमारतीला कल्याण डोंबिवली पालिकेची बांधकाम परवानगी आहे, अशी खोटी माहिती घर खरेदीदारांना देऊन भूमाफिया या बेकायदा इमारती मधील घरे खरेदीदारांना विकून त्यांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

हेही वाचा : Video: ठाण्यात भरदिवसा हवेत गोळीबार; बंदूकीचा धाक दाखवून सराफाला लुटण्याचा प्रयत्न, परंतु सराफाने प्रतिकार करत चोरट्यांना पिटाळले

गेल्या दीड वर्षापासून जुनी डोंबिवली अग्निदेव मंदिराजवळील विघ्नेश्वर कृपा आणि उदयराज या अधिकृत इमारतींच्या मध्यभागी पायवाट बंद करून, गटार तोडून ही बेकायदा प्रकाश गोठे, शंकर ठाकूर या भूमाफियांनी उभारली आहे. या इमारतीमधील सांडपाणी, मलनिस्सारण वाहिन्या लगतच्या पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला नियमबाह्य जोडण्यात आल्या आहेत. जुनी डोंबिवलीतील रहिवाशांच्या मोटारी, दुचाकी या पायवाटेवरून जायच्या. या बेकायदा रहिवाशांचा रस्ता बंद झाला आहे. या इमारतीत काही दुर्घटना घडल्यास अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका या भागात येण्यास जागा नाही. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना ही बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश देण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

या बेकायदा इमारतीत पूर्ण क्षमतेने रहिवास सुरू झाला की परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊन या भागात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची भीती या भागातील रहिवाशांनी व्यक्त केली. या बेकायदा इमारतीवर कारवाई केली नाहीतर हे प्रकरण उच्च न्यायलायत दाखल करण्यात येऊन ही बेकायदा इमारत भुईसपाट करण्याची मागणी केली जाईल, असे तक्रारदाराने सांगितले. ह प्रभागात रेतीबंदर चौकात तीन बेकायदा इमारती, राहुलनगरमध्ये रमाकांत आर्केड, सुदामा रेसिडेन्सी, ठाकुरवाडीत शिवलिला, कुंभारखाणपाडा शिव सावली, कोपर रेल्वे स्थानकाजवळ कोंबड्यांचा खुराडा, कोपरमध्ये सखारामनगर काॅम्पलेक्स जवळ आरक्षित भूखंडावर तीन बेकायदा इमारती, कोपर स्मशानभूमी रस्त्यावर बेकायदा इमारती उभ्या आहेत.

हेही वाचा : ठाणे : मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस

जुनी डोंबिवलीत पायवाट बंद करून प्रकाश गोठे यांनी उभारलेल्या बेकायदा इमारतीची माहिती घेतो. ही बेकायदा इमारत अनधिकृत घोषित केली आहे का. याची तपासणी करून ही इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई आयुक्तांच्या आदेशावरून केली जाईल.

राजेश सावंत (साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली)