डोंबिवली: पावसाळा सुरू झाल्याने नैसर्गिक नाले, ओढे, गटारांचे प्रवाह बंद करून उभारण्यात आलेल्या डोंबिवलीतील भोपर, आयरे, २७ गाव भागातील ग आणि ई प्रभागातील बेकायदा चाळी, जोते पालिकेच्या तोडकाम पथकाने जमीनदोस्त केले. या चाळींमुळे परिसरातील सांडपाण्या्चे प्रवाह बंद झाले होते. त्यामुळे परिसरात दलदल निर्माण झाली होती. पावसाळ्यात हे सांडपाणी तुंंबून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असता. याबाबत पालिकडे नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत, ई प्रभागाच्या प्रभारी साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या तोडकाम पथकाने ही कारवाई केली. आयरे गाव भागात बेकायदा चाळी उभारणीसाठी बांधलेले १० जोते तोडण्यात आले. दोन बेकायदा चाळी जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट करण्यात आल्या. भोपर येथील १५ खोल्यांच्या चाळी, रस्ते अडवून लावलेल्या टपऱ्या तोडण्यात आल्या. आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड नालेसफाईच्या दौऱ्यावर असताना त्यांना ही बेकायदा बांधकामे दिसून आली होती. त्यांंच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा : कल्याणमधील ठाकरे गटाच्या नव्या नेमणुका, सामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजी
डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागात जुनी डोंबिवलीत प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांनी गटार तोडून, सामासिक अंतर न ठेवता फशी हाईट्स, अन्य एक अशा दोन बेकायदा इमारती उभारल्या आहेत. या इमारतींच्या सांंडपाण्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. राहुलनगरमध्ये सुदामा रेसिडेन्सी, रमाकांंत आर्केड या इमारतींलगत गटारे नाहीत. कोपर रेल्वे स्थानकाजवळील शैलेश पाटील यांनी कोंबड्याचा बेकायदा खुराडा सुरू केल्याने परिसरात दुर्गंधीला सुरूवात झाली आहे. ठाकुरवाडीत शाळेच्या आरक्षणावर शिवलिला बेकायदा इमारत उभारण्यात आली आहे. कोपर मधील चरू बामा म्हात्रे शाळेच्या पाठीमागे जुनाट झाडे तोडून बेकायदा इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. कुंभारखाणपाडा खंडोबा मंदिरा जवळ बेकायदा इमारतीचे काम सुरू आहे. गणेशनगरमध्ये रेल्वे मैदानालगत बेकायदा इमारत सुरू आहे. कुंभारखाणपाडा येथे अंजिक्य नारकर यांच्या तोडलेल्या इमारतीचा एक भाग गेल्या महिन्यात पुन्हा उभारण्यात आला आहे. डोंबिवली पूर्वेत फ प्रभागात सुयोग हाॅल गल्लीत आराधना ही सात माळ्याची बेकायदा इमारत निवासयोग्य करण्याच्या हालचाली भूमाफियांनी सुरू केल्या आहेत. त्याची पालिका दखल घेऊन कारवाई करत नसल्याच्या तक्रारी परिसरातील रहिवाशांकडून, तक्रारदारांकडून केल्या जात आहेत.