डोंबिवली : येथील कोपर खाडी किनारी कांदळवनाची कत्तल करुन बेकायदा रेती उपसा करण्याला महसूल विभागाने एक आदेश काढून प्रतिबंध केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर करण्याचा इशारा महसूल आणि पोलीस प्रशासनाने दिला आहे. कोपर खाडी किनारी अहोरात्र मागील १५ वर्षापासून वाळू तस्करांकडून बेकायदा वाळू उपशासाठी कांदळवनाची कत्तल सुरू आहे. या सततच्या कत्तलीमुळे कोपर, डोंबिवली, दिवा, मुंब्रा परिसरातील खाडी किनारची जैवविविधता नष्ट झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोपर परिसरात वाळू तस्करांनी कोपर पश्चिम रेल्वे मार्ग, शहराच्या हद्दीवरील ५०० मीटर पर्यंत वाळू उत्खनन सुरू केले आहे. मुसळधार पाऊस आणि भरतीच्या काळात खाडीचे पाणी कोपर मधील अनेक भागात शिरते. कोपर खाडी किनारचे कांदळवन चाळी बांधून भूमाफिया आणि वाळू उपसा करुन वाळू तस्करांनी नष्ट केले आहे. या भागातील जैवविविधता नष्ट झाली आहे. विविध प्रकारचे पक्षी, जलचर या भागात नियमित पाहण्यास मिळत होते. कांदळवन नष्ट झाल्याने या प्राण्यांचा अधिवास नष्ट झाला आहे. कोपर रेल्वे मार्गालगत वाळू तस्करांकडून वाळू उपसा सुरू असल्याने रेल्वे मार्गाला तस्करांनी धोका निर्माण केला आहे. वाळू तस्करांकडून कोपर भागात मोठ्या प्रमाणात कांदळवनाची कत्तल सुरू आहे.

हेही वाचा : उद्घाटनापूर्वीच अभ्यासिकेच्या दुरुस्तीची वेळ

पर्यावरणाचा हा ऱ्हास होत असताना एकही नियंत्रक सरकारी संस्था हे कांदळवन संवर्धनासाठी प्रयत्न करत नाही. वाळू तस्कारांचा कायमस्वरुपी बिमोड करत नाहीत. या पार्श्वभूमीवर एका पर्यावरणप्रेमीने मुंबई उच्च न्यायालयात कोपर भागातील वाळू उपसा आणि तेथे होणाऱ्या कांदळवन कत्तलीला प्रतिबंध करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणात राज्य शासन, महसूल, पोलिसांना प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेनंतर न्यायालयाचे हुकुम प्राप्त होताच महसूल विभागाने चार महिन्यापूर्वीच कोपर खाडी किनारा परिसरात बेकायदा वाळू उत्खनन, कांदळवन कत्तलीला प्रतिबंध केला आहे.

हेही वाचा : ठाणे: विनयभंग प्रकरणी शिक्षकाला अटक

महसूल विभागाकडून नियमित कोपर, मुंब्रा भागात वाळू तस्करांवर कारवाई केली जात आहे. सततची कारवाई करुनही वाळू तस्कर महसूल, पोलिसांना दाद देत नाहीत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पाऊल उचलले आहे. महसूल विभागाच्या आदेशावरुन विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त राजेंद्र दाभाडे यांनी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कोपर खाडी किनारी रेती उत्खनन, कांदळवन कत्तलीस ८ नोव्हेंबरपर्यंत २४ तास प्रतिबंध केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा : गणेशोत्सवापूर्वीच पाणी प्रश्न गंभीर, उल्हासनगरसह अंबरनाथमध्येही नागरिकांत संताप

कोपरचे कांदळवन

कोपर खाडी किनारी एक लाख ३५ हजार चौरस मीटर क्षेत्रात कांदळवनाचे घनदाट जंगल होते. वाळू तस्कर, बेकायदा चाळी बांधणाऱ्या भूमाफियांनी या जंगलाची कत्तल करुन ते नष्ट केले आहे. कांदळवन नष्ट झाल्याने कोपर, आयरे भागात मागील पाच वर्षापासून खाडीच्या भरतीचे, पुराचे पाणी घुसते. शस्त्रसज्ज होऊन वाळू तस्कर वाळू उपशासाठी खाडीत उतरतात. त्यामुळे स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमी त्यांना विरोध करत नाहीत. पालिका अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आयरे, कोपर पूर्व भागातील कांदळवन बेकायदा चाळींसाठी माफियांनी नष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli illegal sand extraction destroyed kandalvan at kopar khadi revenue department police to take action against sand mafia css