डोंबिवली: कल्याण, डोंबिवली शहरात मागील तीन महिन्यापासून पोलिसांचे नशा मुक्त अभियान सुरू आहे. या विशेष अभियानातून अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या चाळीस दिवसांच्या कालावधीत कल्याण, डोंबिवली शहराच्या विविध भागातून एकूण १२ लाखाहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणात पोलिसांनी १९ जणांना अटक केली आहे.
जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये ६३ ग्रॅम मेफोड्रिन, नशा आणणाऱ्या २३२ कोडिनयुक्त बाटल्या, ४८ किलो गांजाचा समावेश आहे. याप्रकरणात मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत डोंबिवलीत नांदिवली टेकडी भागातून सनिल श्रीसमर्थ यादव (२५) यांच्याकडून ८.४८ ग्रॅम वजनाचा १६ हजार रूपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ तस्करी विरोधी कायद्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथ येथील स्वामी नारायण मंदिराच्या बाजुला असलेल्या मोकळ्या जागेतून रामनगर पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी सचिन एकनाथ कावळे (३२, रा. वसंत केणे चाळ, दत्तनगर, डोंबिवली), दत्तनगर मधील एक १६ वर्षाचा अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २६ ग्रॅम मेफोड्रिन पावडर, १० ग्रॅम चरस जप्त करण्यात आली. या पदार्थांची बाजारातील किंमत ९३ हजार रूपये आहे. त्यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत दुर्गाडी किल्ला भागातील भटाळे तलाव भागातून अंंमली पदार्थ विरोध पथकाने शंकर महादेव गिरी (४६) यांना ताब्यात घेतले आहे. ते मुळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील टाकळी गावचे रहिवासी आहेत. ते मजुरीसाठी कल्याणमध्ये आले होते. त्यांच्या ताब्यातून एक लाख रूपये किमतीचा नऊ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे ते कर्जत दरम्यान गांजा तत्सम अंमली पदार्थांची तस्करी करणारा एक मोठा भाई डोंबिवलीत राहतो. तो किरकोळ विक्रीतून अंमली पदार्थ विकत असतो अशी चर्चा आहे. त्यामुळे डोंबिवली, कल्याण परिसरात मागील अनेक वर्ष गांजाची तस्करी वाढली. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून ही तस्करी, त्यांचे अड्डे उद्धवस्त करण्याची मोहीम सुरू केली आहे.
अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणात १९ जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत १२ लाखाहून अधिक आहे. नशामुक्त शहरे हे शीर्षक घेऊन अंमली पदार्थ तस्कर, अड्ड्यांवर कारवाई तत्परतेने कारवाई केली जात आहे. अशाप्रकरणात नागरिकांनी माहिती दिली तरी त्यांचे नाव गुप्त ठेऊन संबंधित अड्ड्यांवर कारवाई केली जात आहे.
अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त, कल्याण परिमंडल