कल्याण : खड्डे भरणीशी संबंधित ठेकेदार, अभियंत्यांवर कारवाई करणार. खड्डे भरणीची कामे सुरूच आहेत, असे किती दावे पालिका प्रशासनाने केले तरी कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील काँक्रीट रस्ते सोडले तर डांबराच्या रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत. या रस्त्यांवरील खड्डे भरणीची कामे केली जात असली तरी ती तकलादू असल्याने एक ते दोन दिवसात हे खड्डे पुन्हा उघडे पडत आहेत. आ. सत्यजित तांबे यांनी सोमवारी ट्विट करुन कल्याण डोंबिवली शहरातील खडड्यांमुळे शहराची झालेली केविलवाणी अवस्था, या भागातील लोकांची सहनशीलता याविषयी भाष्य केले आहे. हे भाष्य कल्याण, डोंबिवली भागातील लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांवर केलेली विखारी टीका मानली जात आहे.
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत मागील २५ वर्षापासून अधिकारी, नगरसेवकांशी संबंधित काही मोजके गटार, पायवाटा बांधणारे ठेकेदार आता रस्ते बांधकाम, खड्डे बुजविणारे ठेकेदार म्हणून काम करत आहेत. या ठेकेदारांना वजनदार नगरसेवकांचा आशीर्वाद आहे. बांधकाम क्षेत्रातील कोणतीही शैक्षणिक पात्रता नसताना केवळ नगरसेवकाच्या आशीर्वादाने गटार, पायवाटा बांधताना आलेला अनुभव. या अनुभवातून ही ठेकेदार मंडळी मागील २५ वर्ष कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत डांबरी, काँक्रीटचे रस्ते बांधणे, शहरातील खड्डे, चऱ्या बुजविण्याची कामे करत आहेत.
हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीतील नवीन काँक्रीट रस्त्यांची तोडफोड, रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी
बड्या ठेकेदारांच्या हाताखाली काम करणारे हे प्रस्थापित ठेकेदार इतर स्पर्धक, गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या ठेकेदाराला शहरात काम करुन देत नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्ष उल्हासनगर, कल्याण, डोंबिवलीतील लोकप्रतिनिधींच्या पंखाखाली काम करणारे ठेकेदार पालिकेत रस्त्यांची कामे करत आहेत. लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे पालिका अधिकारी या ठेकेदारांनी निकृष्ट, खड्डे भरणीची नाही कामे केले तरी तंबी देण्या व्यतिरिक्त त्यांना नोटिसा काढणे, त्यांचे काम काढून घेणे अशी कार्यवाही करत नाहीत. आपणास काहीही होत नाहीत. लोक ओरडतात गप्प बसतात, ही ठेकेदारांची मानसिकता झाली असल्यामुळे खड्डे, निकृष्ट रस्ते बनविणाऱ्यावर ठेकेदारांचा कल असतो, अशी माहिती एका जाणकाराने दिली. खड्डे पडले नाहीतर प्रस्तावित निधी कसा खर्च होईल याकडे सगळ्यांचे लक्ष असते. हा निधी खड्डे पडण्यास कारणीभूत ठरतो.
खड्डेच खड्डे
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, मलंग गड रस्ता, तिसगाव नाका, आडिवली, ढोकळी, पिसवली, गोळवली सह २७ गावांमधील पोहच रस्त्यांची खड्डे, चिखलाने दुर्दशा झाली आहे. कल्याण पश्चिमेत मोहने, आंबिवली, अटाळी, मांडा, टिटवाळा, शहाड परिसर, गंधारे रस्ता, डोंबिवलीत ठाकुर्ली, पेंडसेनगर मधील व्ही. पी. रस्ता, गणेशनगर मधील पेट्रोलपंप रस्ता, नांदिवली, देसलेपाडा, भोपर रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. एमआयडीसीतील सेवा रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यांकडे एमआयडीसी लक्ष देत नसल्याने उद्योजक हैराण आहेत.
या खड्डेमय रस्त्यांवरुन दररोज येजा करुन रिक्षा, दुचाकी चालक, प्रवाशांना पाठ, मानदुखीचे त्रास सुरू झाले आहेत. शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दुचाकीवरुन शहरातील खड्ड्यांची पाहणी केली. त्यावेळी शहरातील खड्डे गायब होणार असे चित्र होते. त्यानंतर अहिरे यांनी ठेकेदार, अभियंत्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला. तरीही खड्डे कायम असल्याने इतर शहरांप्रमाणे डोंबिवली, कल्याण मधील रस्ते सुस्थितीत कधी होणार, असा प्रश्न संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.