डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील कोपर रस्त्यावरील सिध्दार्थनगरमध्ये दोन भाई भावांची दहशत आहे. सहा दिवसापूर्वी या दोन्ही भाई भावांनी किरकोळ कारणावरून सिध्दार्थनगर झोपडपट्टीत राहत असललेल्या एका तरूणाला आणि त्याच्या आजोबांना शिवीगाळ करत रस्त्यावर बेदम मारहाण केली. हातात दारूची बाटली, चाकू, दगडी घेऊन तरूण आणि त्याच्या आजोबांना वाचविण्यासाठी मध्ये पडणाऱ्या नागरिक, शेजाऱ्यांच्या अंगावर धाऊन जाऊन दहशत माजवली. आम्ही येथले भाई आहोत, अशी दर्पोक्ती करत परिसरात दहशत माजवली.

या मारहाणप्रकरणी व्यंकटेश नायडू (२४) यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणात व्यंकटेश यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ‘भाई’ अजय मगरे, सम्राट मगरे आणि त्यांची महिला नातेवाईक दीपाली दुशींग यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. व्यंकटेश हे ठाणे येथे नोकरी करतात. गेल्या आठवड्यात त्यांनी आपल्या एका मित्राला कोपर रस्त्यावरील सिध्दार्थनगर झोपडपट्टी भागात भेटायला बोलवले होते. मित्र आणि व्यंकटेश गप्पा मारत असताना तेथे अजय मगरे हा दारूच्या नशेत असताना हातात बाटली घेऊन आला.

अजय नशेत असल्याने तो आपल्याशी किरकोळ कारणावरून वाद घालेल म्हणून व्यंकटेशने मित्राला घरी जाण्यास सांगितले. व्यंकटेश स्वता घरी जाण्यासाठी माघारी परतत होता. त्यावेळी अजय व्यंकटेशच्या अंगावर धाऊन आला. तु माझ्या अंगावर का येतोस, असा प्रश्न व्यंकटेशने करताच, अजय मगरे यांनी मी येथला भाई आहे, असे बोलत व्यंकटेशी हुज्जत घातली.

ही बोलाचाली सुरू असताना अजयचा लहान भाऊ भाई सम्राट मगरे माझ्या भावाला कोण बोलतय असे बोलत हातात दगडी घेऊन आला. आम्ही येथले भाई आहोत असे बोलत, शिवीगाळ करत सम्राट मगरेने हातामधील दगडींचा मारा व्यंकटेशच्या दिशेने केला. व्यंकटेशला मारहाण सुरू असताना त्याचे ७० वर्षाचे आजोबा मुर्गेश नायडू तेथे मध्यस्थीसाठी आले. सम्राटने त्यांच्या डोक्यात दगड मारल्याने ते जमिनीवर कोसळले. सम्राटची बहिण दीपाली दुशींग यांनी व्यंकटेशला मारहाण केली.

व्यंकटेश, आजोबांना मारहाण सुरू असल्याने नागरिक, शेजारी हा वाद सोडविण्यासाठी मध्ये पडले. त्यावेळी सम्राटने कमरेचा चाकू बाहेर काढून हात वर करून हवेत फिरवत आता मध्ये कोणी पडले तर त्यांना सोडणार नाही, असे बोलून उपस्थित नागरिकांच्या मगे तो धाऊ लागला. आपल्यावर हल्ला होईल या भीतीने नागरिक सैरावैरा पळून गेले. शेजाऱ्यांनी दारे बंद करून घेतली. अजय आणि सम्राट मगरे यांच्या तावडीतून सुटका करून घेत व्यंकटेश यांनी शास्त्रीनगर रुग्णालयात आजोबांंसह उपचार घेतले. त्यानंतर विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. सिध्दार्थनगर मधील भाईंचा उपायुक्त अतुल झेंडे यांनी बिमोड करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

Story img Loader