डोंबिवली : येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहती मधील कॅलेक्सी कंपनीला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. आगीने तात्काळ रौद्ररुप धारण केल्याने या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला. कंपनी कामगारांनी तात्काळ अग्निप्रतिबंधक यंत्रणेचा वापर करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. तो तोकडा पडला. अग्निशमन दलाला तातडीने ही माहिती देण्यात आली. ते तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : डोंबिवली एमआयडीसीत महानगरची गॅस वाहिका फुटली
एमआयडीसीमध्ये कॅलेक्सी कंपनीचे संशोधन आणि विकास केंद्र आहे. या केंद्रात शुक्रवारी दुपारी कर्मचारी काम करत होते. यावेळी अचानक कंपनीच्या एका विभागातून धूर बाहेर येऊन आगीच्या ज्वाला पसरल्या. कर्मचाऱ्यांनी तातडीने मिळेल त्या मार्गाने बाहेर पडून सुटका करून घेतली. यावेळी एक कामगार मात्र धुरात कोंडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शाॅर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे. औषध उत्पादन प्रक्रियेसंबंधीचे संशोधन आणि विकासाचे काम या कंपनीत सुरू असते. या कंपनीत उत्पादन होत नाही, असे कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेने सोनी यांनी सांगितले.