डोंबिवली : येथील एमआयडीसी भागातील गणपती मंदिर भागात शुक्रवारी दुपारी महानगरची भूमिगत गॅस वाहिका फुटली. वाहिकेमधून उच्च दाबाने गॅस बाहेर पडू लागल्याने काही वेळ परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. महानगरच्या गॅस तंत्रज्ञांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहिकेमधून बाहेर पडणारा गॅस बंद केला. डोंबिवली एमआयडीसी भागात महानगर गॅसकडून घऱोघर गॅस पुरवठा केला जातो.
हेही वाचा : कल्याण-डोंबिवली: नऊ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित, नेमकं कारण काय?
शुक्रवारी दुपारी एमआयडीसी गणपती मंदिर भागात एमआयडीसीकडून मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यासाठी कामगारांकडून खोदाकाम केले जात होते. हे काम सुरू असताना अचानक एका कामगाराच्या धारदार टिकावचा घाव गॅस वाहिकेवर लागल्याने उच्च दाबाने गॅस बाहेर येऊ लागला. मोठा आवाज येऊ लागल्याने परिसरातील रहिवासी, पादचारी घडला प्रकार पाहत बसले. गॅसचे धुरासारखे लोट परिसरात पसरले. कडवट दुर्गंधी या भागात पसरली. कामगार भीतीने दूर पळाले. ही माहिती तातडीने नागरिकांनी अग्निशमन दल, महानगर गॅसच्या तंत्रज्ञांना दिली. त्यांनी तातडीने एमआयडीसीचा गॅस पुरवठा बंद केला. दुरुस्तीचे काम हाती घेऊन गॅस वाहिका सुस्थितीत केली.