डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील फेज क्रमांक दोन मध्ये एका एम्ब्राॅयडरी कंपनीत व्यवस्थापक आणि पर्यवेक्षक यांनी एका महिला कामगाराचा विनयभंग करून त्या महिलेचा अश्लिल भाषेत उल्लेख करून तिला लाथांनी मारहाण केली. याप्रकरणी महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केली. कंपनीत महिला कामगाराला मारहाण झाल्याची माहिती मिळताच डोंबिवली भाजपच्या महिला पदाधिकारी मनीषा राणे यांनी संबंधित कंपनीच्या ठिकाणी जाऊन महिलेकडून माहिती घेतली. कामगार महिलेची व्यथा ऐकून मनीषा राणे यांनी याप्रकरणात पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून दोन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. भाजप महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्याने पोलिसांनी दोन्ही अधिकाऱ्यांना अटक केली.
डोंबिवली एमआयडीसीतील फेज दोन मधील राईस मील कम्पाऊंड मधील एस. एस. एम्ब्राॅयडरी कंपनीत बुधवारी संध्याकाळी हा मारहाणीचा प्रकार घडला. याप्रकरणात पोलिसांनी एम्ब्राॅयडरी कंपनीतील पर्यवेक्षक विजय दौलत बेडल (४५, रा. वांगणी), व्यवस्थापक रणजित भगवान आगवणे (४७) यांना अटक केली आहे.पोलीस ठाण्यातील तक्रारीत महिला कामगाराने म्हटले आहे की एस. एस. एम्ब्राॅयडरी कंपनीत मी एम्ब्राॅयडरीचे काम करते.
डोंबिवलीत कुटुंबीयांसह राहते. बुधवारी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान ३६ वर्षाची पीडित कामगार महिला कंपनीत काम करत होती. त्यावेळी तेथे व्यवस्थापक रणजित आगवणे आले. त्यांनी पीडित कामगार महिलेला आपणास वाढीव काम देणार नाही असे सांगितले. या विषयावरून व्यवस्थापक आगवणे यांनी कामगार महिले बरोबर वाद घालून त्यांचा अश्लिल शब्दात उल्लेख करून, गैरकृ्त्य करून त्यांच्या ओटीपोटीत लाथा मारल्या. तसेच त्यांचा विनयभंग केला. पर्यवेक्षक विजय बेडल तेथे आले. त्यांनीही कामगार महिले संदर्भात अश्लिल शब्दांचा वापर करून त्यांचा अवमान केला.
ही माहिती मिळताच भाजपच्या महिला पदाधिकारी मनीषा राणे यांनी याप्रकरणातील दोन्ही अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्या्ंना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली. पोलिसांनी व्यवस्थापक, पर्यवेक्षकांना तातडीने अटक केली. या दोघांवर मारहाण, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या नेतृत्वाखाली याप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.