डोंबिवली : डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील लोढा पलावा येथील लोढा ॲव्हेन्स बस थांबा ते कल्याणमधील बिर्ला महाविद्यालय दरम्यान बसने प्रवास करत असताना एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थीनीचा एका २० वर्षाच्या तरूणाने विनयभंग केला. शुक्रवारी दुपारी हा प्रकार बसमध्ये घडला आहे.
घडल्या प्रकाराची मुलीने पहिले महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. ही घटना मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील असल्याने हा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, शुक्रवारी दुपारी लोढा ॲव्हेन्स ते कल्याण मधील बिर्ला महाविद्यालय दरम्यानच्या बसमध्ये मी प्रवास करत होते. या बसमध्ये बसलेला एका तरूण अल्पवयीन आपल्याकडे पाहून सारखा हसत होता. बस डोंबिवलीजवळील पिसवली भागातील टाटा नाका भागात आली त्यावेळी तरूणाने आपला हात पकडला. आपण त्याच्या हाताला झटका देऊन त्याला दूर केले. अल्पवयीन मुलगी कल्याणमध्ये बसमध्ये उतरल्यानंतर तरुणाने पुन्हा त्या मुलीला उद्देशून आपण पुन्हा भेटू् असे बोलू लागला. मुलगी महाविद्यालयाच्या दिशेने जात असताना तरूण पुन्हा या मुलीच्या पाठीमागे चालत जाऊन तिच्याकडे मोबाईल क्रमांंक, इन्स्टाग्राम आयडी मागू लागला. आपणाजवळ इन्सटाग्राम आयडी नाही असे सांगून मुलीने स्वताचा मोबाईल तरूणाला देण्यास नकार दिला. त्याचा राग येऊन तरूणाने मुलीच्या हातामधील मोबाईल हिसकावून घेतला. मोबाईलमध्ये स्वताच्या मोबाईल नंबरचे आकडे भरून आपला मोबाईल क्रमांक मुलीला देण्याचा प्रयत्न केला.
या सगळ्या प्रकाराने अल्पवयीन मुलगी घाबरली होती. या तरूणाकडून काही गैरकृत्य होण्याची शक्यता असल्याने मुलीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. मानपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. या तरूणाच्या मोबाईल क्रमांकावरून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव पालवे तपास करत आहेत.