डोंबिवली : येथील पूर्व रेल्वे स्थानक भागातील बाजीप्रभू चौकातील पाटकर प्लाझामधील पालिकेचे तळघरातील रिकामे वाहनतळ गेल्या काही दिवसांपासून सांडपाण्याने तुंबले आहे. या तुंबलेल्या पाण्याला दुर्गंधी आणि त्यावर डास निर्माण झाल्याने या भागात व्यवसाय करणारे व्यापारी त्रस्त आहेत. याप्रकरणी आम्ही पालिकेला पत्र दिली आहेत, असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली पालिकेची बाजीप्रभू चौकातील पाटकर प्लाझामध्ये तळघरात वाहनतळाची जागा आहे. तळ आणि पहिला मजला अशा व्दिस्तरीय वाहनतळाची येथे व्यवस्था आहे. ही वाहनतळे सुरू करण्यात यावीत म्हणून मागील सहा वर्षापासून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक अधिकारी, रिक्षा संघटना प्रयत्नशील आहेत. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुढाकार घेऊन हे वाहनतळ सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. इतर राजकीय अडथळ्यांमुळे हा विषय नंतर मागे पडला.
हेही वाचा : कल्याण : बाह्यवळण रस्ते मार्गातील अटाळी येथील १२५ बांधकामे जमीनदोस्त
पाटकर प्लाझा मधील तळघरातील रिकाम्या वाहनतळाच्या जागेत गेल्या काही दिवसांपासून दोन ते तीन फूट सांडपाणी तुंबले आहे. हे तुंबलेले पाणी वाहून जाण्यास मार्गिका नाही. अनेक दिवसांच्या या तुंबलेल्या सांडपाण्यामुळे या भागात दुर्गंधी पसरली आहे. त्यावर डास तयार झाले आहेत. चिमणी गल्ली, पाटकर प्लाझामध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्याचा त्रास होत आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा त्रास होतो. या वाहनतळाच्या तळघरातील सांडपाणी काढून हे वाहनतळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिक, व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
व्यापाऱ्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी या भागात दररोज जंतुनाशक, डीडीटी फवारणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. तसेच तळघरातील सांडपाणी बाहेर काढण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील यादृष्टीने त्यांनी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हालचाली सुरू केल्या आहेत.
हेही वाचा : बेदरकार ट्रकने चिरडल्याने एकाचा मृत्यू; बदलापूर येथील घटना, चालक ताब्यात
पाटकर प्लाझामधील तळघरातील वाहनतळाच्या जागेत सांडपाणी तुंबल्याच्या जागेत दररोज डीडीटी, जंतुनाशक फवारणी केली जात आहे. हे सांडपाणी बाहेर काढण्याच्या दृष्टीने हालचाली करत आहोत. या वाहनतळाच्या जागेचा पुरेपूर वापर करण्याच्या दृष्टीने आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांचे मार्गदर्शन घेत आहे.
हेमा मुंबरकर ( साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली)
सांंडपाणी तुंबलेल्या वाहनतळाच्या जागेत दररोज जंतुनाशक फवारणी केली जात आहे. हे पाणी कोठुन येते. ते तातडीने बंद होईल यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने संबंंधितांना कळविण्यात येणार आहे.
शरद पांढरे (स्वच्छता अधिकारी)