डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेत नवापाडा येथे मराठी शाळेच्या बाजुला पवन चौधरी या भूमाफियाने चार वर्षापूर्वी पाच माळ्याच्या बेकायदा इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. या बेकायदा बांधकामा विरुध्दच्या तक्रारीवरून पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयाने चार वर्षापूर्वी हे बांधकाम अनधिकृत घोषित करून स्वताहून तोडून घेण्याची नोटीस माफियाला बजावली होती. दरम्यानच्या काळात बांधकामधारकाने हे पाच माळ्याचे बांधकाम पूर्ण करून तेथे रहिवास सुरू केला. पालिकेच्या ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या निर्देशावरून अधीक्षक अरूण पाटील यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात पवन चौधरी यांच्या विरुध्द गुरुवारी एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला.
राहुलनगरमधील रमाकांत आर्केड या बेकायदा इमारतीच्या भूमाफियांवर गेल्या आठवड्यात ह प्रभागाने एमआरटीपीची कारवाई केली आहे. ह प्रभागापासून हाकेच्या अंतरावर डोंबिवली पश्चिमेतील भोईर जीमखान्याच्या पाठीमागील बाजुला नवापाड्यातील मराठी शाळेच्या बाजुला पवन चौधरी यांनी चार वर्षापूर्वी सामासिक अंतर न ठेवता बेकायदा इमारतीची उभारणी केली. या बेकायदा इमारतीविषयी पालिकेत तक्रारी आल्या. जून २०२१ मध्ये तत्कालीन साहाय्यक आयुक्तांनी या बांधकामाचे धारक पवन चौधरी यांना नोटीस पाठवून बांधकाम परवानगीसह जमिनीची कागदपत्रे दाखल करण्याचे आदेश दिले होते. सात दिवसाच्या कालावधीत चौधरी यांनी बांधकाम परवानगीची आवश्यक कागदपत्रे पालिकेत सादर केली नाहीत.
जुलै २०२१ मध्ये तत्कालीन साहाय्यक आयुक्तांनी पवन चौधरी यांचे नवापाड्यातील पाच माळ्याच्या बेकायदा इमारतीचे बांधकाम अनधिकृत घोषित केले. हे बांधकाम पंधरा दिवसात स्वताहून तोडून घेण्याची तंबी ह प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी चौधरी यांना दिली होती. चौधरी यांनी त्या नोटिसीला दाद दिली नाही. त्यांनी दरम्यानच्या काळात बेकायदा इमारतीचे पाच माळ्याचे बांधकाम पूर्ण केले. मागील चार वर्षाच्या काळात या बेकायदा इमारतीमधील सदनिका घर खरेदीदारांना विकून या इमारतीत रहिवास निर्माण केला. रहिवाशांनी ही इमारत अधिकृत आहे म्हणून घरे खरेदी केली आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने ह प्रभागातील पंडित दिनदयाळ रस्त्यावरील तिरूपती छाया (मोरे टाॅवर) या तोडलेल्या बेकायदा इमारतीची पुन्हा कशी उभारणी झाली. या बेकायदा बांधकामाला कोण अधिकारी जबाबदार आहे याविषयीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले आहेत. या सगळ्या प्रकरणात अधिकारी अडचणीत आले आहेत. ह प्रभाग हद्दीतील जुन्या राजकीय अभय मिळालेल्या बेकायदा इमारतींच्या भूमाफियांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्याची मोहीम ह प्रभाग साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी उघडली आहे. याच मोहिमेतून पवन चौधरी या भूमाफिया विरुध्द अधीक्षक अरूण पाटील यांनी महाराष्ट्र प्रांतिक अधिनियम आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियमाने गुरुवारी गु्न्हा दाखल केला आहे.