लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागातील नाले, गटारांमधून चोरीच्या जलवाहिन्या बेकायदा चाळी, इमारतींना भूमाफियांकडून घेण्यात आल्या आहेत. नाले, गटारांमधील या जलवाहिन्यांना शहरातून वाहून येणारा कचरा, गाळ अडकून पडत असल्याने त्या भागात कचऱ्याचे थर साचत आहेत. खाडीच्या दिशेने वाहून जाणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होत आहे.

पालिकेने नाले, गटार सफाईचा दावा केला असला तरी नाले, गटारांमध्ये कचऱ्याला अडथळा ठरणाऱ्या कोपर भागातील जलवाहिन्या पालिका अधिकारी, नाले सफाईच्या ठेकेदारांनी स्थानिक राजकीय मंडळीच्या दहशतीमुळे काढून टाकल्या नसल्याचे समजते. कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील नाल्यातून, गटारांमध्ये चोरीच्या जलवाहिन्या माफियांनी कोपर पूर्व भागात नेल्या आहेत. या जलवाहिन्या पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून घेण्यात आल्या आहेत. हे चोरीचे प्रकरण गेल्या वर्षी ‘लोकसत्ता’ने उघडकीला आणले होते. त्यानंतर ग प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी कोपर पूर्व, आयरे भागातील चोरीच्या जलवाहिन्यांवर कारवाई केली होती.

हेही वाचा… कळवा ठाणे मार्गावर वाहनांच्या रांगा

कोपर पश्चिमेतील नाल्यांमधील जलवाहिन्यांवर पालिकेकडून कोणतीही कारवाई केली नसल्याने या जलवाहिन्यांना नाल्या मधील कचरा, गाळ अडकून पडत आहे. खाडीकडे वाहून जाणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होत आहे. या कचऱ्यामुळे मुसळधार पावसाचे पाणी नाल्यात अडून आजुबाजुच्या वस्तीत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा… आधीच पाऊस आणि त्यात बिघाडाचा खोळंबा! बदलापूरजवळ मालगाडीचं इंजिन बिघडल्याने लोकल सेवेवर परिणाम

पहिल्याच पावसात कोपर पश्चिमेतील रेल्वे स्थानका जवळील, खाडी दिशेने जाणारे नाले गाळ, कचऱ्याने भरुन गेले आहेत. परिसरात राहणाऱ्या रहिवाशांची चिंता वाढली आहे. यावर्षी नाले, गटार सफाईची कामे अतिशय ढिसाळ पध्दतीने ठेकेदारांनी केल्यामुळे त्याचा फटका मुसळधार पाऊस सुरू होईल तसा नागरिकांना बसण्यास सुरूवात होईल, असे जाणकार नागरिकांकडून सांगितले.

Story img Loader