कल्याण – उप अधीक्षक, भूमि अभिलेख, कल्याण विभागातर्फे कल्याण, डोंबिवली परिसरातील नागरिकांच्या नगर भूमापन विभागातील तक्रारींचे निराकरण आणि फेरफार नोंदीसाठी येत्या बुधवारी (ता. १६) डोंबिवली येथे फेरफार अदालतचे सकाळी १० ते संध्याकाळी पाच या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. वारस नोंद विषयक प्रकरणे असलेल्या अधिकाधिक नागरिकांनी या फेरफार अदालतमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कल्याण येथील भूमि अभिलेख विभागाचे उप अधीक्षक यांनी केले आहे.
ही फेरफार अदालत डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगर मधील बहिणाबाई उद्यान परिसरातील परिक्षण भूमापक कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे. या फेरफार अदालतमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपल्या सर्व प्रकारच्या मूळ कागदपत्रांसह हजर राहावे. फेरफार अदालतच्या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना डोंबिवली पूर्वेतील रामनगर भागातील वाहतूक विभाग, रामनगर पोलीस ठाण्याजवळील रिक्षा वाहनतळावरून रिक्षेने प्रवास करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसात लोकाभिमुख आपल्या विभागांची कामे मार्गी लावण्याचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या नावीन्यपूर्ण कृती आराखड्याच्या उपक्रमातून फेरफार अदालतचा कार्यक्रम भूमि अभिलेख विभागाकडून आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांना एकाच ठिकाणी आपले वारस नोंदीचे प्रश्न मार्गी लावण्याची संधी उपलब्ध होणार आहे, असे कल्याण भूमि अभिलेख विभागाच्या उप अधीक्षकांनी सांगितले.
भूमि अभिलेख विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या नगर भूमापन विभागातील मिळकत पत्रिकेवर वारस नोंद करणे, वारस पत्रावरून मयत व्यक्तिचे नाव कमी करणे, एखाद्याने जमीन खरेदीने, बक्षिसपात्र करून, हक्कसोड पध्दतीने घेतली असेल तर या कागदपत्रांच्या आधारे फेरफार नोंदणीचे काम या फेरफार अदालतमध्ये केले जाणार आहे. याशिवाय कुटुंबातील व्यक्ति मरण पावल्यानंतर त्याच्या नावे असलेली जमीन, मालमत्तांवरील नावे विहित मार्गाने कमी केल्यानंतर मयत व्यक्तिच्या वारसाच्या नावे ती मालमत्ता फेरफार नोंदीने होणे आवश्यक असते. या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अनेक वारसांना कामाच्या ठिकाणी सुट्टी टाकून वारस नोंदीसाठी हेलपाटे मारावे लागतात. एका फेरीत अशी कामे होत नाहीत. त्यामुळे वारसदार त्रस्त होतो. अशाप्रकारची वारस नोंदीची कामे या फेरफार अदालतमध्ये होणार आहेत.
शासनाच्या सूचनेप्रमाणे कल्याण, डोंबिवलीतील अनेक गृहसंकुलांनी आपल्या सोसायटीचे मानीव अभिहस्तांतरण करून घेतले आहे. इमारतीच्या जमीन मालकाच्या नावे असलेला यापूर्वीचा सात बारा, फेरफार संबंधित सोसायटीच्या नावे होणे आवश्यक असते. ही कामे मार्गी लावण्यासाठी सोसायटी पदाधिकारी, त्यांचे मार्गदर्शक वकील सल्लागार प्रयत्नशील असतात. ही कामेही या फेरफार अदालतमध्ये मार्गी लावण्यात येणार आहेत. या शिबिरात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उप अधीक्षकांनी केले आहे.