डोंबिवली : डोंबिवली परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुकानदारांची खरेदी केलेल्या सामानाच्या माध्यमातून ऑनलाईन माध्यमातून फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. या प्रकारामुळे दुकानदार वर्ग हैराण आहे. अनेक दुकानदारांनी याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत.

रविवारी संध्याकाळी डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिलीतील डाॅ. नेमाडे गल्ली भागात एक महिला दुकानदार सायली सावंत यांची दोन अल्पवयीन मुलांनी एक हजार ५७५ रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. ही मुले महिला, ज्येष्ठ नागरिक, वृध्द दुकानात असेल त्यावेळीच दुकानात सामान खरेदीसाठी येतात.

हेही वाचा : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आव्हाडांचे कार्यकर्ते सावध, एप्रिल महिन्यात आव्हाड यांनाही आली होती बिष्णोई टोळीची धमकी

सामान खरेदीसाठी आल्यावर ते सुमारे ५०० हून अधिक रकमेचे किराणा सामान खरेदी करतात. आम्हाला रोख रकमेची गरज आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला एक ते दोन हजार रूपये द्या. म्हणजे सामान खरेदीचे पैसे आणि तुमच्याकडून घेतलेले पैसे असे एकूण रक्कम आम्ही तुम्हाला समोरच ऑनलाईन माध्यमातून पाठवितो, असे दुकानदाराला सांगतात.

दुकानदाराच्या समोरच ते त्यांनी पैसे पाठविल्याचा बनावट लघुसंदेश पाठवितात. दुकानदाराला मेसेज येताच त्याला ग्राहकाकडून पैसे मिळाल्याचे वाटते. नंतर जेव्हा दुकानदार आपल्या बँक खात्यात ग्राहकाने पाठविलेले ऑनलाईन माध्यमातील पैसे मिळाले की नाही हे तपासतो. त्यावेळी बँकेत पैसे जमा झालेले नसतात. ग्राहकाने पाठविलेला लघुसंदेश बनावट असल्याचे दुकानदाराला समजते. असे प्रकार अलीकडे डोंबिवली शहर परिसरात वाढले आहेत.

हेही वाचा : कल्याणमध्ये राजकीय फलक फाडून राजकीय,सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न

जुनी डोंबिवलीतील डाॅ. नेमाडे गल्लीतील एका गाळ्यात सायली सावंत या कोकणात तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री करतात. रविवारी संंध्याकाळी दोन मुले त्यांच्या दुकानात आली. त्यांनी सायली सावंत यांच्या दुकानात विविध प्रकारचे ५७५ रूपयांचे सामान खरेदी केले. या सामानाचे पैसे देण्याऐवजी त्यांनी सायली यांच्याकडून वाढीव एक हजार रूपये रोख मागून घेतले. एक हजार रूपये आणि सामानाचे असे एकूण १ हजार ५७५ रूपये ऑनलाईन पध्दतीने तात्काळ पाठवितो असे दुकानदार महिलेला सांगितले. दुकानासमोर उभे राहूनच दोन्ही मुलांनी सायली यांच्या मोबाईलवर एक बनावट लघुसंदेश पाठवून १५७५ रूपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहेत, असे दर्शविले.

हेही वाचा : घामाच्या धारांमुळे वातानुकूलित लोकलमधील गर्दी वाढली; प्रवाशांना लोकल डब्यात लोटण्यासाठी कल्याण-डोंबिवली स्थानकात जवानांची दमछाक

सायली यांनी खरेदीदार मुले दुकानासमोरून गेल्यानंतर मोबाईलमधील संदेशाची पडताळणी केली आणि बँक खात्यात पैसे जमा झालेत का म्हणून खात्री केली तेव्हा त्यांना मुलांनी आपणास ऑनलाईन पैसे भरतो म्हणून बनावट लघुसंदेश पाठविला आहे, असे लक्षात आले. आपल्या बँक खात्यातही पैसे जमा झाले नाहीत, असे समजले. सोमवारी सकाळी सायली सावंत यांनी या फसवणूक प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.