डोंबिवली : आपल्या इमारती नियमितीकरणासाठी आपणास पुरेसा अवधी दिला. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभागातील आयरेतील (कोपर पूर्व रेल्वे स्थानक) बेकायदा साई गॅलेक्सीचे नियमितीकरणाचे प्रकरण ऐकून घेण्यास नकार देत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी गुरुवारी हे प्रकरण फेटाळून लावले. पालिकेने नियमितीकरणासाठी दाखल केलेले अर्ज फेटाळून लावल्याने, असाच आदेश आम्ही इतर सोसायट्यांच्या संदर्भात देऊ, असे स्पष्ट संकेत खंडपीठाने दिले. खंडपीठाच्या या संकेतांमुळे डोंबिवलीतील महारेरातील ५१ बेकायदा इमारतींवर पालिकेचा हातोडा पडणार असल्याचे स्पष्ट झाले.
याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांच्या विरुध्द तीन वर्षापूर्वी एक याचिका न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाने १९ नोव्हेंबर २०२४ रोजी डोंबिवलीत पालिकेच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारलेल्या, महारेरेचा नोंदणी क्रमांक मिळविलेल्या या बेकायदा इमारती १९ फेब्रुवारीपर्यंत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. पालिकेने तीन महिन्यापूर्वी इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा रहिवाशांना दिल्या आहेत.
डिसेंबरमध्ये १६ इमारतींमधील रहिवासी, विकासकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आपले प्रस्ताव कल्याण डोंबिवली पालिकेत नियमितीकरणासाठी दाखल केले आहेत, अशी भूमिका घेतली. नियमितीकरणासाठीची आवश्यक कागदपत्रे रहिवाशांनी पालिकेत दाखल न केल्याने नगररचना विभागाने ३२ बेकायदा इमारतींचे प्रस्ताव फेटाळून लावले.
पालिकेने फेटाळलेली प्रकरणे
शांताराम आर्केड, गावदेवी, गावदेवी हाईट्स, शिवाजीनगर, तुलीप हाईट्स, शिवाजीनगर, द्रौपदी हाईट्स, शिवाजीनगर, एकविरा एन्टरप्रायझेस, आयरे, साईश इन्फ्रा, पाथर्ली, बालाजी डेव्हलपर्स, नांदिवली, तुकाराम पाटील, निळजे, रतन चांगो म्हात्रे, नांदिवली, सुनील बालाजी पाटील, आडिवली, राजाराम भोजने, गोळवली, विनायक वाटिका, सोनारपाडा, श्री काॅम्पलेक्स, नांदिवली, वाळकू हेरिटेज, आजदे, शिवसाई रेसिडेन्सी, सोनारपाडा, अर्णव काॅम्पलेक्स, नांदिवली, दिनकर प्लाझा, आडिवली, मंगलमूर्ती, माणगाव, पंढरीनाथ गायकर, गोळवली, इंद्रदास गायकर, गोळवली, साईलिल रेसिडेन्सी, देसलेपाडा, साई श्रध्दा, आडिवली, गोकुळ काॅम्पलेक्स, निळजे, विष्णु व्हॅली, माणगाव, शिवसाई बालाजी, आजदे, वारा हाईट्स, जुनी डोंबिवली, लालचंद म्हात्रे, नवागाव, शिवलिला, नवागाव, मणिरत्न, शिवाजीनगर, लक्ष्मण हाईट्स, कोपर, सुदामा रेसिडेन्सी, ठाकुर्ली, राजयोब, ठाकुर्ली, संतुला आर्केड, कोपर, समर्थ काॅमलेक्स, आयरे, सनराईज, कांचनगाव, साई गॅलेक्सी, आयरे, जियाश्री प्राईड, कांचनगाव.
५१ इमारतींवर हातोडा
६५ इमारतींमधील ५ इमारती पालिका क्षेत्राबाहेरील. ६० मधील दोन इमारतींची व्दिनोंद, एका इमारतीचे बांधकाम सुरू नाही. सहा इमारती पाडल्या. त्यामुळे ५१ इमारतींचे निष्कासन.
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे डोंबिवलीतील ६५ रेरा प्रकरणातील अनधिकृत इमारती पोलिसांच्या साहाय्याने रहिवास मुक्त केल्या जातील. त्यानंतर या इमारतींवर कारवाई सुरू केली जाईल. – अवधूत तावडे, उपायुक्त, अतिक्रमण नियंत्रण.
नियमितीकरणासाठी दाखल बेकायदा साई गॅलेक्सीचे प्रकरण न्यायालयाने फेटाळले. इतर प्रकरणांबाबतही तोच निर्णय राहणार असल्याने पालिकेची भूमिका या इमारती तोडण्याची असेल. – ॲड. ए. एस. राव, सल्लागार वकील, क. डों. म. पा.