डोंबिवली : मध्य रेल्वेच्या डोंबिवली जवळील कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या, प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकलमधील दरवाजात उभा असलेला एक प्रवासी रेल्वे मार्गात पडून गंभीर जखमी झाला आहे. कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. एक प्रवासी लोकलमधून पडल्याची माहिती गार्डने मोटरमनला देताच. काही क्षण तेथे लोकल थांबवून काही प्रवाशांना पडलेल्या प्रवाशाला मदत करण्यासाठी तेथे उतरण्यास सांगण्यात आले. पडलेल्या प्रवाशाच्या डोक्याला सर्वाधिक मार लागल्याने त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू होता. तो बेशुध्दावस्थेत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाच प्रवाशांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. दिवा आणि कोपर दोन्ही रेल्वे स्थानके अपघात स्थळापासून दूर होती. त्यामुळे या प्रवाशांनी डोंबिवलीकडून येणाऱ्या एका लोकलला हात केला. काही क्षण प्रवासी पडल्याच्या ठिकाणी थांबविण्यात आली. जखमी प्रवाशाला एका डब्यात चढवून त्याला दिवा येथे रेल्वे सुरक्षा जवानांच्या ताब्यात पुढील उपचारासाठी देण्यात आले. या प्रवाशाची अद्याप ओळख पटली नव्हती. हा प्रवासी कल्याणकडून येणाऱ्या अतिजलद लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करत होता. डोंबिवली, कोपरनंतर लोकलने वेग घेताच, या प्रवाशाचा तोल गेला असावा आणि तो रेल्वे मार्गात पडला असण्याची शक्यता लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : कल्याण: टिटवाळ्यात विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासू-सासर्‍यांसह तीन जण अटकेत

दर आठवड्याला दोन ते तीन प्रवासी कोपर ते मुंब्रा रेल्वे मार्गात पडून मृत्युमुखी पडत असल्याने याविषयाची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची मागणी विविध रेल्वे प्रवासी संघटनांनी वेळोवेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. उपनगरी रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांबरोबरच्या प्रत्येक बैठकीत या भागातील अपघातांचा विषय उपस्थित करून अधिकाऱ्यांना याविषयी काही उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli passenger seriously injured after falling from local train between kopar and diva railway station css