डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील विष्णुनगर मधील पंडित दिनदयाळ रस्त्याच्या छेद रस्त्यावरील जिद्द रुग्णालयाच्या गल्लीमधील एका कोपऱ्यावर दोन बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत. एका बेकायदा इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या इमारतीचे बांधकाम घाईने पूर्ण केले जात आहे. विष्णुनगर या मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या भागात भूमाफियांनी गल्लीतील रस्ता अडवून सात माळ्यांची बेकायदा इमारती उभारली असून ही इमारत ‘ह’ प्रभागातील बीट मुकादम, कनिष्ठ अभियंता यांना दिसत नाही का? असे प्रश्न या भागातील रहिवासी करत आहेत. या बांधकामांच्या सुरक्षिततेसाठी लावलेले पत्रे गल्लीतून येजा करणाऱ्या पादचाऱ्यांना अडथळा ठरत आहेत.
भूमाफियांनी एक इमारत बांधून पूर्ण केली आहे. या इमारतीला घाईने रंगरंगोटी करून त्यातील सदनिका विक्री करण्याच्या हालचाली माफियांनी सुरू केल्या आहेत. याच इमारतीजवळ भूमाफियांनी तातडीने दुसऱ्या बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. या दोन्ही बेकायदा इमारतींचा मोठा अडथळा आजुबाजुच्या इमारतींना निर्माण झाला आहे. पालिकेच्या ‘ह’ प्रभाग अधिकाऱ्यांनी तातडीने या बेकायदा बांधकामांची पाहणी करून त्यांना नोटिसा बजावून त्या जमीनदोस्त कराव्यात, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. काही दिवसापूर्वीच डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगरमध्ये बेकायदा इमारती उभारणाऱ्या चार भूमाफियांना ‘ह’ प्रभाग कार्यालयाने नोटिसा पाठविल्या आहेत. या नोटिसांना भूमाफियांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही, तर राहुलनगरमधील चारही इमारती भुईसपाट केल्या जाणार आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा : कल्याणमध्ये ३८ परिचारिका विद्यार्थिनींची ५२ लाखांची फसवणूक; ‘उडाण’ संस्थेकडून फसवणूक झाल्याचा आरोप
अशाच पध्दतीने दिनदयाळ छेद रस्त्यावरील जिद्द रुग्णालय गल्लीतील दोन बेकायदा बांधकामांना पालिकेने नोटिसा देऊन, विहित वेळेत या दोन्ही इमारती भुईसपाट कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. दिनदयाळ छेद गल्लीत एकाही नवीन बांधकामाला परवानगी दिली नाही, असे पालिका नगररचना अधिकाऱ्याने सांगितले. ‘ग’ प्रभाग हद्दीत आयरे गाव भागात एका भूमाफियाने वळण रस्त्याच्या मार्गात बेकायदा इमारत बांधली आहे. यासंदर्भातच्या तक्रारी वाढत असुनही ‘ग’ प्रभाग कार्यालयाने या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्याची मागणी आयरेतील नागरिकांकडून केली जात आहे.