डोंबिवली : दिवाळी सणामुळे पुढील १० दिवस शहरांमधील रस्त्यांवर तुफान गर्दी होईल, याची जाणीव असुनही मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या ठेकेदाराने डोंबिवली पूर्व शिवमंदिर स्मशानभूमीचा रस्ता खोदून ठेवल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा रस्ता खोदल्यामुळे शिवमंदिर स्मशानभूमीत पार्थिव घेऊन जाणाऱ्या नातेवाईकांना वळसा घेऊन स्मशानभूमीत जावे लागत आहे. डोंबिवली पूर्व भागातील शिवमंदिर रस्ता सर्वाधिक वर्दळीचा रस्ता ओळखला जातो. या रस्त्यावर बाजारपेठ आहे.
डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात जाणारी वाहने याच रस्त्यावरून ये-जा करतात. शहराच्या विविध भागातील मृत्यू झालेल्यांचे पार्थिव याच रस्त्यावरून शिवमंदिर स्मशानभूमीत नेले जातात. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाकडून सुनीलनगर, नांदिवली, नेरूररकर रस्ता भागात जाण्याचा हा मधला मार्ग आहे. बहुतांशी प्रवासी या रस्त्याचा उपयोग करतात. डोंबिवली शहरातील बहुतांशी रस्ते ‘एमएमआरडीए’कडून केले जात आहेत. पालिका अभियंत्यांना विश्वासात न घेता, रस्ता खोदल्यामुळे शहरात काय परिस्थिती निर्माण होऊ शकेल याची माहिती न घेता एमएमआरडीए ठेकेदार मनमानीने रस्ता खोदाई करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांची अडचण होत आहे.
हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत रस्त्यावर फटाक्यांचे स्टाॅल लावण्यात शिवसेना-भाजप आघाडीवर
शिवमंदिर रस्त्याच्या बाजुला नेरूरकर रस्त्याचा १५ फुटी तिरंगी झेंडा ते स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर शाळेसमोरील काँक्रीट रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने आयरे भागातून येजा करणाऱ्या प्रवाशांना फेरा घेऊन इच्छित स्थळी जावे लागते. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर कोंडी होते. नेरूरकर रस्त्याचे काम सुरू असताना त्याच्या बाजुला शिवमंदिर स्मशाभूमी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम घाईने हाती घेणे योग्य नव्हते, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
हेही वाचा : मध्य रेल्वेच्या ढिसाळपणामुळे प्रवासी मेटाकुटीला; रोजच्या ७० फेऱ्या रद्द, शेकडो लोकल विलंबाने
एकाच भागात दोन रस्ते काँक्रीटीकरणासाठी खोदून ठेवल्याने ऐन दिवाळीत डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर, शिवमंदिर परिसर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकणार आहे. अशाच पध्दतीने डोंबिवली पश्चिमेत गणेशनगर भागात सर्वाधिक वर्दळीचा रस्ता काँक्रीटीकरणासाठी खोदून ठेवण्यात आला आहे. अरुंद असलेल्या या रस्त्याचा एक भाग गेल्या आठवड्यात खणून ठेवला आहे. त्यामुळे या रस्त्यावर सकाळ संध्याकाळ कोंडी होत आहे. गणेशनगर रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने रेल्वे स्थानकाकडून गणेशनगर, कुंभारखाणपाडा, नवापाडा, चिंचोड्याचा पाडा भागात राहणाऱ्या प्रवाशांना वळसा घेऊन जावे लागते. हा रस्ता लवकर पूर्ण करण्याची प्रवाशांची मागणी आहे. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हेही वाचा : कल्याणमध्ये कोंबडी-कुत्र्याच्या भांडणातून श्वान प्रेमीला मारहाण
घरडा सर्कल कोंडी
घरडा सर्कल ते आर. आर. रुग्णालय दरम्यान फेरीवाले, व्यापारी संकुल, खानपान सेवेची टोलेजंग दुकाने झाली आहेत. याठिकाणी दररोज संध्याकाळपासून अनेक खवय्ये वाहने घेऊन रस्त्यावर उभी करून खाद्यपदार्थांचा स्वाद घेतात. माऊली सभागृहाच्या बाहेर एक वाहन दुरुस्तीचे गॅरेज आहे. ही वाहने रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. “एमएमआरडीएकडून शहरात सुरू असलेल्या बहुतांशी रस्ते कामे पूर्ण करण्याची मुदत डिसेंबर आहे. त्यामुळे ही कामे प्राधान्याने हाती घेण्यात आली आहेत.”, असे कंडोमपाचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी म्हटले आहे.