डोंबिवली: येथील फडके रोडवरील कुळकर्णी ब्रदर्स आणि अंबिका हाॅटेल लगतच्या रेन ट्री या जुनाट झाडाच्या फांद्या मुसळधार पावसाने वाकून मोठ्या वाहनांना अडथळा ठरू लागल्या. या फांद्या या भागातील महावितरणच्या जिवंत वीज वाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे पालिकेच्या अग्निशमन जवानांनी बुधवारी सकाळी या झाडाच्या वाहनांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या, वीज वाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या फांद्या तोडून टाकल्या.

दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाच्या सततच्या माऱ्याने डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील कुळकर्णी ब्रदर्स आणि अंबिका हाॅटेल लगत असलेले एका रेन ट्रीच्या जुनाट झाडाच्या फांद्या रस्त्यावर वाकल्या होत्या. या फांद्या केडीएमटी बस, कंपन्यांच्या बसना अडथळा येत होत्या. या फांद्या अचानक रस्त्यावर पडल्यावर तर पादचाऱ्यांना धोका आणि रिक्षेवर पडल्यावर रिक्षेचे नुकसान होण्याची शक्यता होती.

हेही वाचा : डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीच्या छताला गळती; स्मशानभूमीत पाण्याची तळी, लाकडे भिजत असल्याने टायर, केरोसिनचा वापर

या भागातील व्यापाऱ्यांनी याबाबतची माहिती पालिकेच्या अग्निशमन जवानांना दिली. जवानांनी एक तासाच्या कालावधीत या झाडाच्या धोकादायक असलेल्या फांंद्या तोडून टाकल्या. तोपर्यंत फडके रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे येणारी वाहने खोळंबून राहिली होती. या रस्त्यावर वाहन कोंडी झाली होती. या कामासाठी या भागातील वीज पुरवठा काम पूर्ण होईपर्यंत खंडित करण्यात आला होता.

हेही वाचा : कल्याणमध्ये सुरक्षा रक्षकांचे वेतन रखडवल्याने मंगेशी संस्कार सोसायटीच्या रहिवाशांना कोंडून ठेवले

फडके रस्त्यावर सकाळच्या वेळेत कोंडी झाल्याने अनेक प्रवाशांनी मदन ठाकरे चौक भागात उतरून पायी नेहरू रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे जाणे पसंंत केले. बुधवारी सकाळी वर्दळीच्या वेळेत हा प्रकार सुरू होता. डोंबिवली, कल्याण परिसरात अनेक जुनाट झाडे वर्दळीच्या रस्त्यांंवर आहेत. या झाडांबाबत पालिकेने नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून निर्णय घेण्याची मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे.

Story img Loader