डोंबिवली : डोंबिवलीतील मानपाडा रस्त्यावरील मातोश्री चायनिज ढाबा, कोळेगाव येथील आई एकविरा ढाबा आणि खोणी तळोजा रस्त्यावरील चायना गार्डन चायनिज काॅर्नर ढाबा मालकांविरुध्द पोलिसांनी मद्य विक्रीचा कोणताही परवाना नसताना चायनिज ढाब्यात ग्राहकांना बेकायदा दारू विक्री केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
या तिन्ही ढाब्यांमध्ये चवीदार चायनिज आणि सोबत दारू मिळत असल्याने दिवस, रात्र या ढाब्यांना ग्राहकांची पसंती असते. डोंबिवली, कल्याण, शिळफाटा, पलावा, बदलापूर, मलंगगड भागातून ग्राहक याठिकाणी श्रमपरिहारासाठी येतात. मातोश्री, आई एकविरा आणि चायना गार्डन ढाबे मालक मद्य विक्रीचा परवाना नसताना ढाब्यांवर मद्य विक्री करत असल्याच्या वाढत्या तक्रारी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्याकडे आल्या होत्या.
मागील चार दिवसापूर्वी पोलिसांनी दुपारच्या वेळेत या तिन्ही ढाब्यांवर अचानक छापे टाकले. साहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, हवालदार सोपान शेळके आणि पथकाने दुपारच्या वेळेत काटई बदलापूर पाईप लाईन रस्त्यावरील कोळेगाव येथील किशोर कुंडलिक पाटील (रा. अंतर्ली ) यांच्या आई एकविरा ढाब्यावर छापा टाकला. पोलिसांना ढाब्यात मंचकावर दारूचे पेले घेऊन ग्राहक बसले होते. विदेशी मद्याच्या बाटल्या पोलिसांना तेथे आढळल्या.
पोलिसांनी ढाबा मालक किशोर पाटील यांच्याकडे ढाब्यात दारू विक्री करण्यासाठी असलेली आवश्यक दारू विक्रीची शासन परवानगी मागितली. ती परवानगी किशोर पाटील दाखवू शकले नाहीत. चायनिज ढाब्याच्या नावाखाली ढाब्यात बेकायदा दारू विक्री केली म्हणून हवालदार सोपान शेळके यांनी ढाबा मालक कुंडलिक पाटील यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला.
या कारवाईनंतर पथकाने खोणी तळोजा रस्त्यावरील लोढा प्रवेशद्वार क्रमांक तीन समोर चायना गार्डन चायनिज ढाब्याचे मालक रुपेश नारायण भंडारी (रा. हेदुटणे) यांच्या ढाब्यावर छापा टाकाला. तेथेही बेकायदा दारू विक्री सुरू असल्याचे पोलिसांना आढळले. रूपेश यांच्याकडे दारू विक्रीचा परवाना नव्हता, त्यामुळे हवालदार अशोक आहेर यांनी रुपेश भंडारी यांच्या विरुध्द प्रतिबंधात्मक गुन्हा दाखल केला.
डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावरील शिवसेना कार्यालयामागील जागेत प्रभाकर सिताराम लिहे (रा. सोनारपाडा) मातोश्री चायनिज ढाबा चालवितात. या ढाब्यावर पोलिसांनी धाड टाकली. तेथेही त्यांना ढाब्यात विना परवानगी दारू विक्री सुरू असल्याचे आढळले. हवालदार विजय आव्हाड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी लिहे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे कल्याण, डोंबिवली परिसरातील चायनिज ढाबे, चायनिज हातगाड्यांवर ढाबे मालक बेकायदा दारू विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही ढाब्यांवर रात्रीच्या वेळेत अंमली पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत.