डोंबिवली रेल्वे स्थानकातील पश्चिम बाजूकडील पंडित दिन दयाळ चौकातील रेल्वे स्थानकात आणि डोंबिवली पूर्व बाजुला जाणारा जिना रेल्वे प्रशासनाने देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी बुधवार रात्रीपासून बंद केला आहे. अचानक जिना बंद केल्याने डोंबिवली पूर्वेतून पश्चिमेत येणाऱ्या आणि पश्चिमेतून पूर्व भागात, रेल्वे स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांना वळसा घेऊन जावे लागत आहे.
जिना बंद करण्यापूर्वी प्रशासनाने दोन दिवस अगोदर जिन्याच्या ठिकाणी जिना बंदची पूर्वसूचना लावणे आवश्यक होते, असे प्रवाशांकडून सांगण्यात येते. गुरुवारी सकाळीच अनेक प्रवासी डोंबिवली पश्चिमेतील व्दारका हाॅटेलकडील जिन्याकडून रेल्वे स्थानकात, पूर्व बाजूला जाण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना रेल्वे जिना बंद असल्याचे आढळले.
हेही वाचा… टीएमटीतील सवलतीचा प्रवास फक्त महापालिका क्षेत्रातील महिलांनाच
डोंबिवली पूर्व भागातून स्कायवाॅकवरून डोंंबिवली पश्चिमेकडे येणाऱ्या प्रवाशांना दिनदयाळ चौकातील जिना बंद असल्याचे दिसताच त्यांना स्कायवाॅकवरून माघारी जाऊन दुसऱ्या जिन्याने यावे लागले. बहुतांशी प्रवासी नाख्ये उद्योग समुहाजवळील स्कायवाॅकने रेल्वे स्थानकात, पूर्व भागात जात आहेत. गेल्या वर्षभरात डोंबिवली रेल्वे स्थानकातील दिवा बाजुकडील जिन्याची दोन वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा… ठाणे शहरात मोक्याच्या ठिकाणी भाजपचे प्रशस्त कार्यालय
या सततच्या दुरुस्तीच्या कामामुळे प्रवाशांना वळसा घेऊन जावे लागत असल्याने प्रवासी या सततच्या कामांविषयी नाराजी व्यक्त करत आहे. रेल्वे जिना दुरुस्तीचे काम किती दिवस सुरू राहणार आहे याविषयी बंद फलकावर काही लिहिलेले नाही. त्यामुळे प्रवासी संभ्रमात आहेत.