डोंबिवली : सकाळच्या वेळेत डोंबिवली रेल्वे स्थानकातून महिलांच्या डब्यात चढून वस्तूंची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांची गुरुवारी सकाळपासून रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी कसून तपासणी सुरू केली आहे. गर्दीच्या वेळेत अनेक पुरुष फेरीवाले महिला डब्यात चढून ठाणे, घाटकोपर, कुर्ला पर्यंत सुरक्षित प्रवास करतात. याविषयी ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित करताच रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली.
अनेक पुरुष फेरीवाले सकाळच्या वेळेत लोकल डब्यात प्रवाशांची खचाखच गर्दी असते म्हणून सुरक्षित प्रवासासाठी वस्तू विक्रीच्या नावाखाली महिला डब्यात शिरतात. वस्तू विक्रीच्या नावाखाली ठाणे, घाटकोपर, कुर्ला पर्यंत प्रवास करतात. महिला डबा महिला प्रवाशांनी खचाखच भरलेला असतो. अशा गर्दीतून वाट काढत पुरुष फेरीवाले वस्तू विक्री करत डब्यातून फिरतात. या पुरुष फेरीवाल्यांना अनेक महिला प्रवासी डब्यात चढण्यास मज्जाव करतात. पण ते त्यांना दाद देत नाहीत.
हेही वाचा : कोपर खाडीत कांदळवनाची कत्तल, रेती उपशाला बंदी, महसूल, पोलिसांचे आदेश
गर्दीच्या वेळेत पुरुष फेरीवाले डब्यात चढल्याने महिला प्रवाशांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. पोलिसांना तक्रार केली तर पोलिसांकडून आपले नाव जाहीर होईल. आपल्याला त्रास होईल या विचाराने कोणी महिला याविषयी तक्रार करत नव्हती. डोंबिवली रेल्वे स्थानकात महिला डब्यातून पुरुष फेरीवाले प्रवास करत असल्याचे वृत्त बुधवारी ‘लोकसत्ता’ने प्रसिध्द केले.
हेही वाचा : उद्घाटनापूर्वीच अभ्यासिकेच्या दुरुस्तीची वेळ
रेल्वे प्रशासनाने या वृत्ती गंभीर दखल घेतली. गुरुवारी सकाळपासून डोंबिवली लोकलसह इतर लोकलच्या महिला डब्यात फेरीवाले आहेत का याची तपासणी रेल्व सुरक्षा बळाचे जवान, लोहमार्ग पोलीस करत होते. अशा प्रकारची तपासणी नियमित करण्याची मागणी महिला प्रवाशांनी रेल्वे पोलिसांकडे केली. उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी यापूर्वीच अनेक वेळा फेरीवाल्यांचा गर्दीच्या वेळेत महिला डब्यातील प्रवासाविषयी रेल्वेच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत.