डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर सीएसएमटी बाजूकडील विस्तारित फलाटाच्या भागावर गेल्या वर्षापासून छत नाही. त्यामुळे गेले आठ महिने उन्हाचा त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांना आता लोकलमध्ये चढताना पावसाचा मारा सहन करावा लागणार आहे. गेल्या वर्षापासून प्रवाशांंकडून, रेल्वे प्रवासी संघटनांकडून डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील विस्तारित भागात छत बांधण्याची मागणी रेल्वे अधिकाऱ्यांंकडे केली जात आहे. या कामासाठी निधी मंंजूर आहे. काम लवकर सुरू होणार आहे, अशी आश्वासने अधिकारी वर्षभर देत आहेत. प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.

आता पाऊस सुरू झाल्याने प्रवाशांना फलाट क्रमांक पाचवर छत असलेल्या भागात उभे राहावे लागते. ठाकुर्ली दिशेकडून लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात येत आहे. हे दिसल्यावर मग प्रवासी छताखालून निघून छत नसलेल्या भागात जातात. यावेळी हातात छत्री असल्याने लोकलमध्ये चढताना प्रवाशांना छत्री मिटून मग चढावे लागते. या कालावधीत प्रवासी भिजून ओलेचिंब होत आहेत. सकाळच्या वेळेत लोकलला तुफान गर्दी असते. या कालावधीत अनेकांच्या छत्र्या उघडताना किंवा मिटताना नादुरुस्त होत असल्याच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले

या सगळ्या गडबडीत महिला प्रवाशांची सर्वाधिक कुचंबणा होत आहे. वातानुकूलित लोकलचे दरवाजे काही सेकंदांनी उघडतात. त्यानंंतर प्रवाशांना लोकलमध्ये चढावे लागते. तोपर्यंत प्रवाशांना छत्री मिटून पावसात भिजावे लागते. रेल्वे प्रशासनाने डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांचे होणारे हाल विचारात घेऊन फलाट क्रमांक पाचवर छत टाकण्याचे काम सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

रेल्वे स्थानकात गळती

डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकातील फलाटांवर अनेक ठिकाणी छत, विस्तारिकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. काही ठिकाणी पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. ते स्कायवाॅकला जोडण्यात आले आहेत. या तांत्रिक बाबींमुळे अनेक ठिकाणी रेल्वे स्थानकात पावसाचे पाणी गळत आहे. डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकाचा बहुतांशी भाग पावसाच्या पाण्याने गळत असल्याने प्रवाशांंमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. फलाटावर छताखाली उभे राहिले तरी काही ठिकाणी पावसाचे पाणी ठिपकत असल्याच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा – डोंबिवलीत देवीचापाडा येथे खारफुटीवर मातीचा भराव, शासनाने घेतली गंभीर दखल

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटाचे विस्तारिकरण झाल्यानंतर त्यावर तात्काळ छत उभारणे गरजेचे होते. विस्तारित भागात लोकल थांबविणे सुरू करण्यात आले. मग या भागात छत न टाकून रेल्वे प्रशासन प्रवाशांचा अंत का पाहत आहे. छताच्या मागणीसाठी अनेक पत्रे रेल्वे प्रशासनाला दिली आहेत. काही दुर्घटना घडेल तेव्हाच रेल्वे प्रशासन जागे होईल का. – लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय रेल्वे महिला प्रवासी संघ.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटावर रेल्वेने लवकरच निवाऱ्याची उभारणी करावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते प्रवाशांच्या पुढाकाराने आंदोलन करतील. – मनोज घरत, माजी अध्यक्ष, मनसे, डोंबिवली.