डोंबिवली: डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर रस्त्यावरील दत्तनगर भागातील स्मशानभूमीच्या छताला सततच्या उष्ण ज्वालांनी छिद्रे पडली आहेत. या छिद्रांमधून पावसाचे पाणी थेट लाकडे रचलेल्या चित्तेवर, स्मशानभूमीत पडत असल्याने स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. स्मशानभूमीत पाण्याची तळी साचत आहेत. पार्थिवाच्या दहनासाठी वापरण्यात येणारी लाकडे भिजत असल्याने ही लाकडे पेटविण्यासाठी टायर, केरोसिनचा वापर करावा लागत आहे. या सगळ्या प्रकाराविषयी स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवलीतील शहराच्या मध्यवर्ति ठिकाणची स्मशानभूमी म्हणून दत्तनगर मधील शिवमंदिर स्मशानभूमी ओळखली जाते. डोंबिवलीसह पलावा भागातून पार्थिव या स्मशानभूमीत दहनासाठी आणले जातात. यापूर्वी ही स्मशानभूमी स्वच्छ आणि पावसाची गळती होणार नाही अशा पध्दतीने पालिका, सामाजिक संस्थांंकडून ठेवली जात होती. दररोज या स्मशानभूमीत सुमारे १० ते १५ पार्थिव दहनासाठी आणले जातात. सततच्या उष्ण ज्वालांनी या पत्र्यांची क्षमता कमी होते. सडलेल्या भागातून पावसाचे पाणी थेट स्मशानभूमीत येते, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : पत्रीपुलावर नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाची बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी

शिवमंदिर स्मशानभूमीत चारही बाजुने पाण्याची गळती सुरू आहे. दहनासाठी पार्थिक चित्तेवर ठेवले की त्यावरही पावसाच्या पाण्याती गळती सुरू होते. चित्तेवरील लाकडे पेटण्यासाठी केरोसिन, तूप, टायर टाकून चित्ता पेटवावी लागते. यामुळे प्रदूषण होते, असे सामाजिक कार्यकर्ते मकरंद माडखोलकर यांनी सांगितले.

दत्तनगर परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी आग्रही असणाऱ्या, या भागात सर्व प्रकारच्या पालिकेच्या सुविधा आणण्यासाठी तत्पर असणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींना शिवमंदिर स्मशानभूमीची दुरवस्था दिसत नाही का, असा प्रश्न माडखोलकर यांंनी केला. केवळ प्रभाग सुशोभित ठेवला म्हणजे सुधारणा केल्या असे होत नाही, असे माडखोलकर म्हणाले.

हेही वाचा : कल्याणमध्ये सुरक्षा रक्षकांचे वेतन रखडवल्याने मंगेशी संस्कार सोसायटीच्या रहिवाशांना कोंडून ठेवले

शिवमंदिर स्मशानभूमीची दुरवस्था पाहून अनेक नातेवाईक पाथर्ली येथील स्मशानभूमीत पार्थिव दहनासाठी नेत आहेत. एकीकडे कल्याण, डोंबिवली शहरे स्मार्ट सिटी करण्यासाठी निघालेल्या कल्याण डोंबिवली पालिकेला स्मशानभूमीसाठी विशेष निधी ठेऊन ती अत्याधुनिक करता येत नाही का, असे प्रश्न नागरिक करत आहेत. दोन हजार कोटीचा अर्थसंकल्प असणाऱ्या पालिकेला शहरातील एक स्मशानभूमी अत्याधुनिक करता येत नाही हे लाजिरवाणे आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार वसंत कशेळकर यांनी व्यक्त केले.

बंद पाडण्याचा डाव

शिवमंदिर स्मशानभूमी परिसरात नवीन गृहसंंकुले उभी राहत आहेत. या गृहसंकुलांना शिवमंदिर स्मशानभूमीचा मोठा अडथळा येत आहे. स्मशानभूमीमुळे नवीन गृहसंकुलात घरे घेण्यास घर खरेदीदार तयार होत नाहीत. त्यामुळे ही स्मशानभूमी बंद पाडून ती दुसरीकडे हलविण्याच्या सुप्त जोरदार हालचाली सुरू असल्याची चर्चा शहरात आहे.

हेही वाचा : ठाणे: देहविक्री करणाऱ्या महिलांचा उद्योजकतेकडे प्रवास

शिवमंदिर स्मशानभूमीचे छत खराब झाले आहे. ते दोन दिवसात सुस्थितीत करून स्मशाभूमीतील गळती थांबविण्यात येणार आहे.

मनोज सांगळे (कार्यकारी अभियंता)

दुरवस्था झालेल्या शिवमंदिर स्मशानभूमीसाठी आयुक्तांनी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. सतत विकासाचा ध्यास घेतलेल्या खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनीही या महत्वपूर्ण लक्ष घालावे.

मकरंद माडखोलकर (सामाजिक कार्यकर्ते)
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli roof of shiv mandir crematorium leakages css