डोंबिवली : डोंबिवली जवळील लोढा हेवन भागात दुचाकीवरून जात असताना दुचाकीवर दुचाकी स्वाराच्या पाठीमागील आसनावर बसलेल्या ६१ वर्षाच्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणाची अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
भारती विजयकुमार भोई (६१) असे मरण पावलेल्या ज्येष्ठ नागरिक महिलेचे नाव आहे. भारती भोई यांचा मुलगा जतीन भोई (३५) यांनी याप्रकरणाची मानपाडा पोलिसांना माहिती दिली. भोई कुटुंब हे पलावामधील कासाबेला गोल्ड भागात राहते. शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजताच्या दरम्यान दुचाकी स्वार जतीन भोई हे आपली आई भारती भोई यांना दुचाकीवर बसून लोढा हेवन भागातील बाजारात खरेदीसाठी चालले होते. त्यांची आई दुचाकीवर पाठीमागील आसनावर बसली होती.
दुचाकी लोढा हेवन बाजाराच्या दिशेकडील रस्त्यावरून जात होती. त्यावेळी एका खड्ड्यातून दुचाकी जात असताना दुचाकीला थोडा हादरा बसून दुचाकीच्या पाठीमागील आसनावर बसलेल्या भारती भोई यांचा तोल गेला. त्या दुचाकीवरून जमिनीवर पडल्या. दुचाकीवरून वेगात पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. डोक्याला जोराचा फटका बसल्याने त्या अत्यवस्थ झाल्या. मुलगा जतीन भोई यांनी आईला तातडीने डोंबिवली एमआयडीसीतील ए्म्स रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे दाखल करण्यापूर्वीच डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. पालवे याप्रकरणाचा तपास करत आहेत. कल्याण, डोंबिवली शहराच्या अनेक भागात सेवा वाहिन्या टाकणे, गटार कामांंमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर पडलेले खड्डे मत्युचे सापळे बनले आहेत. डोंबिवली पूर्वेत नेहरू रस्त्यावर गणपती मंदिरालगत अनेक महि्न्यांपासून सेवा वाहिनी टाकण्यासाठी मुख्य वर्दळीचा रस्ता खणून ठेवला आहे. याठिकाणची चरी काम झाल्यानंतर ठेकेदाराने व्यस्थित भरली नाही. त्यामुळे या चरीत दररोज वाहन चालकांना वेग कमी करून मग वाहन चालवावे लागते. दुचाकी स्वारांना याठिकाणी नेहमीच कसरत करून दुचाकी चालवावी लागते. डोंबिवली पश्चिमेत सुभाष रस्ता, छेद रस्त्यांची दुरवस्था झालीआहे.